मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्याशी संबंधित आठ मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने टाच आणली आहे. त्यात कुर्ला, वांद्रे व उस्मानाबाद येथील मालमत्तांचा समावेश आहे. गेल्या महिन्यात ‘ईडी’ने मुंबई उपनगर जिल्हा निबंधक कार्यालयात पत्र पाठवून, मलिक यांच्या मुंबईतील मालमत्तांची कागदपत्रे मागवली होती.

कुर्ला पश्चिम येथील गोवावाला कंपाऊंड, कुर्ला पश्चिम येथील व्यावसायिक मालमत्ता, तीन सदनिका, उस्मानाबाद येथील १४७ एकर जमीन, वांद्रे पश्चिम येथील दोन सदनिका या मालमत्तांवर ‘ईडी’ने कारवाई केली आहे. या मालमत्ता नवाब मलिक, त्यांचे कुटुंबिय, मे. सॉलिड्स इन्वेस्टमेंट प्रा. लि. व मे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या नावावर आहेत. याशिवाय मे. सॉलिड्स इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. व मे. मलिक इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यामार्फत या मालमत्तांवर गोळा करण्यात आलेले ११ कोटी ७० लाख रुपयांचे भाडेही गुन्ह्यांतील उत्पन्न असल्याचे ‘ईडी’कडून सांगण्यात आले.

मुनिरा प्लंबर यांची कुर्ला एलबीएस मार्ग येथे तीन एकर जागा होती. त्याची किंमत ३०० कोटी रुपये आहे. १९७० मध्ये मुनिरा यांचे वडील फझलभाई गोवावाला यांच्या मृत्यूनंतर मुनिरा व त्यांची आई मरियम गोवावाला यांच्या वाटय़ाला जमिनीचा समान हिस्सा आला. गोवावाला यांचा २०१५ मध्ये मृत्यू झाला. त्यानंतर मुनिरा या मालत्तेच्या एकटय़ा वारस झाल्या. या जमिनीवरील अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी मुनिरा यांनी पॉवर ऑफ अ‍ॅटर्नी सलीम पटेल नावाच्या व्यक्तीला दिली होती. या जमिनीच्या विक्रीमध्ये सरदार शहावली खान व सलीम पटेल यांनी प्रमुख भूमिका बजावली. सरदार शहाबली खान हा १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार आहे. सलीम पटेल हा हसिना पारकरचा चालक होता. त्यांचा जबाब ‘ईडी’ने नोंदवला आहे. त्यात नवाब मलिक व हसिना पारकर यांनी या जमिनीचा मोठा भाग बळकावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी मुनिरा यांना धमकावण्यातही आले. सॉलीड्स ही कंपनी मलिक यांनी खरेदी केली. त्यामुळे मलिक कुटुंबिय या जागेचे भाडेकरू झाले. या भाडे करारावरील जागेची मालकी सलीम पटेलकडील मुखत्यारनाम्याच्या माध्यमातून मिळवण्यात आली. उर्वरित जागेची मालकी सलीम पटेलच्या माध्यमातून हसीना पारकरने घेतली, असे सरदार खान याने जबाबात सांगितले आहे. त्याबाबत हसिना पारकर व मलिक यांच्यात झालेल्या बैठकांवेळी उपस्थित असल्याचे खान याने त्याच्या जबाबात सांगितल्याचा दावा ‘ईडी’कडून करण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने दाऊद इब्राहिम याच्याविरोधात दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारावर ‘ईडी’ने गुन्हा दाखल केला होता.

अटकेविरोधातील याचिकेवर तातडीने सुनावणी
नवी दिल्ली : आर्थिक गैरव्यवहाराच्या एका प्रकरणात ‘ईडी’ने केलेल्या अटकेला आव्हान देणाऱ्या नवाब मलिक यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दर्शवली. मलिक यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांच्या युक्तिवादाची नोंद घेऊन सरन्यायाधीश एन.व्ही. रमण यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने या प्रकरणावर तातडीने सुनावणी घेणार असल्याचे स्पष्ट केल़े