मुंबई : देशातील प्रसिद्ध विमा कंपनी युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनीतील दोन कर्मचाऱ्यांनी विविध खात्यातून १७० कोटींची रक्कम काढल्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) गुन्हा दाखल केला. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने गुन्हा दाखल केला आहे. आरोपी पती-पत्नी दोघेही कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक पदावर कामाला होते. दोघांनीही गैरव्यवहारातील रकमेतून मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी कुशल सिंह (३९) व त्याची पत्नी नीलम सिंह या दोघांविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. कुशल सिंह व त्याची पत्नी दोघेही कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामाला होते. कुशल हा कंपनीच्या चर्चगेट येथील कॉर्पोरेट शाखेत अकाउंट्स विभागात काम करत होता. याप्रकरणी कंपनीचे उपव्यवस्थापक जयदीप सिन्हा(५६) यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे. कंपनीच्या करंट अकाउंटमध्ये अनियमितता असल्याची माहिती मुंबईतील खासगी बँकेने कंपनीला दिली होती. चेन्नई येथील कार्यालयाकडून या अनियमिततेबाबतची माहिती सिन्हा यांच्या विभागाला मिळाली. याप्रकरणी विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. या चौकशीत आरोपी सिंग यांनी सात विविध खात्यांमध्ये रक्कम जमा करून गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर दोघांनाही गेल्यावर्षी जानेवारीत आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Mar 2022 रोजी प्रकाशित
१७० कोटींच्या गैरव्यवहाराप्रकरणी ईडीकडून गुन्हा
या चौकशीत आरोपी सिंग यांनी सात विविध खात्यांमध्ये रक्कम जमा करून गैरव्यवहार केल्याचे निष्पन्न झाले
Written by लोकसत्ता टीम

First published on: 22-03-2022 at 02:16 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ed books couple for rs 1 crore fraud at united india insurance zws