पारेख अॅल्युमिनेक्स लिमिटेडशी संबंधित एका प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ईडीकडून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत होती. दरम्यान, संक्तवसुली संचालनालयाने आज मुंबईतील रक्षा बुलियन आणि क्लासिक मार्बल्स यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापेमारी केली. यावेळी एकूण ४३१ किलो सोनं-चांदी जप्त करण्यात आली.

हेही वाचा – मस्कतहून कोचीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानानं धावपट्टीवरच घेतला पेट, पाहा VIDEO

या छापेमारी दरम्यान ईडीने बुनियन यांच्या खासगी लॉकर्सची झडती घेतली असता त्यातून ९१.५ किलो सोने, १५२ किलो चांदी जप्त करण्यात आली. तसेच रक्षा बुलियन यांच्याशी संबंधित जागेवरून १८८ किलो अतिरिक्त चांदीही जप्त करण्यात आली. या संपूर्ण कारवाईत ईडीने एकूण ४३१ किलो सोने-चांदी जप्त केली.

दरम्यान, यासंदर्भात ईडीकडून एक निवेदन जारी करण्यात आले. ”आम्ही या छाप्यादरम्यान ४३१ किलो सोने-चांदी जप्त केली. यावेळी आम्ही काही खासगी लॉकर्सही तपासले आहे. हे लॉकर्स जिथे होते तिथे कोणतेही सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. हे लॉकर्स घेताना कोणतीही केवायसी करण्यात आली नव्हती. तसेच येण्या-जाण्याची कोणतीही नोंद करण्यात येत नव्हती”,असे या निवेदनात सांगण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?

२०१८ मध्ये पारेख अॅल्युमिनिक्स लिमिटेड कंपनीविरुद्ध २२९६ कोटी रुपयांची कर्ज फसवणूक आणि मनी लाँड्रिंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाच्या तपासादरम्यान रक्षा बुलियन्स आणि क्लासिक मार्बल्स यांच्यात काही आर्थिक व्यवहार समोर आले होते. त्यानुसार आज ईडीने दोघांशी संबंधित काही ठिकाणी छापेमारी केली.