मुंबईः उत्तर प्रदेशात अवैधरित्या धर्मांतर केल्याचा आरोप असलेला जलालुद्दीन उर्फ छांगुर बाबा प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईतील माहीम व वांद्रे पूर्व येथील दोन ठिकाणांसह देशभरात १४ ठिकाणी छापे टाकले. उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील उतरौलामध्ये उर्वरित १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. छांगुर बाबाच्या एका साथीदारांच्या खात्यात दोन कोटी रुपये रक्कम असल्याची माहिती ईडीला मिळाली असून त्याबाबत कारवाई सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, अवैध धर्मांतर प्रकरणी आरोपी असलेल्या छांगुर बाबाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. ईडीच्या अनेक पथकांनी गुरुवारी सकाळी बलरामपूरपासून मुंबईपर्यंत एकाच वेळी छापे टाकले. त्यात मुंबईतील वांद्रे पूर्व व माहीम पश्चिम येथील ठिकाणांचा समावेश आहे. लखनौ ईडीचे पथक गुरूवारी पहाटे मुंबईत आले होते. त्यांनी देशभरात एकाच वेळी छापे टाकले. यावेळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांसह पोलिसांचीही मदत घेण्यात आली आहे. प्राथमिक तपासात अवैधरित्या कमवण्यात आलेली रक्कम विविध मालमत्तांमध्ये गुंतवण्यात आली आहे. त्या रकमेचा माग ईडी काढत असून त्याच अनुषंगाने मुंबईत दोन ठिकाणी छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. यामागे मोठा कट असल्याचा संशय असून त्याची तपासणी सुरू आहे. याप्रकरणी डिजिटल उपकरणे, मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे व बँक व्यवहाराशी संबंधित कागदपत्रे ईडीने जप्त केली असून याप्रकरणी काही संशयीतांना चौकशीसाठी समन्सही बजावण्यात येणार आहे.

उत्तर प्रदेशात १२, तर मुंबई दोन ठिकाणी छापे

उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने छांगुर बाबा आणि त्याची सहकारी नीतू यांना अटक केली होती. सात दिवसांच्या पोलीस कोठडीत त्यांची चौकशी केली असता अनेक महत्त्वाचे खुलासे झाले होते. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील १२ ठिकाणांसह मुंबईतील दोन ठिकाणी ईडीने छापे टाकले. मुख्य कारवाई उत्तर प्रदेशात सुरू असल्याेच सूत्रांनी सांगितले.

छांगुर बाबा कोण ?

छांगुर बाबावर मोठ्या प्रमाणात महिलांचे अवैधरित्या धर्मांतर केल्याचा आणि त्यासाठी त्याला परदेशातून रक्कम मिळल्याचा आरोप आहे. एटीएसने या प्रकरणातील छांगुरचा मुलगा आणि नवीन रोहर यांना यापूर्वीच अटक केली आहे. एटीएसने या प्रकरणात एकूण १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या टोळीने गरीब, विधवा महिलांना हेरून त्यांचे बेकायदेशिररित्या धर्मांतर केल्याचा आरोप आहे.