मुंबई : दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी तपास करणाऱ्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परिवहनमंत्री अनिल परब यांना सोमवारी नवे समन्स बजावले. परब यांना मंगळवारी चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. परब यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे २०१७ मध्ये एक कोटी रुपयांना जमीन खरेदी केली होती, परंतु २०१९ मध्ये त्याची नोंदणी झाली होती. त्यानंतर ही जमीन २०२० मध्ये मुंबईतील एका केबल ऑपरेटरला एक कोटी १० लाख रुपयांना विकली आणि २०१७ ते २०२० दरम्यान या जमिनीवर रिसॉर्ट बांधण्यात आल्याचा आरोप आहे. रिसॉर्टचे बांधकाम २०१७ मध्ये सुरू झाले आणि त्यावर सहा कोटींहून अधिक खर्च झाल्याचा आरोप आहे. यापूर्वी या प्रकरणी प्राप्तिकर विभागाने तपासणी केली होती. त्या तपासाच्या आधारावर या प्रकरणी आर्थिक गैरव्यवहार (मनी लाँडिरग) झाल्याचा ईडीला संशय असून त्याबाबत सध्या तपास सुरू आहे. यापूर्वी या प्रकरणी सात ठिकाणी ईडीने छापे टाकून शोधमोहीम राबवली होती. त्यानंतर ईडीने परब यांना गेल्या आठवडय़ात समन्स बजावून बुधवारी (१५ जून) चौकशीला उपस्थित राहण्यासाठी सांगितले होते. पण त्या वेळी ते अनुपस्थित राहिले. त्यानंतर ईडीने परब यांना पुन्हा समन्स बजावले आहे.