एसटीच्या ढेपाळलेल्या कारभाराला गती देण्यासाठी महामंडळाचे सुकाणू विकास खारगे यांच्या हाती देण्यात आले आहे. त्याचबरोबर प्रशासनातही मोठे फेरबदल करण्यात आले असून सनदी अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे १६ अधिकाऱ्यांवर अतिरिक्त कार्यभाराचे ओझे टाकण्यात आले आहे.
एसटीचा कारभार अलीकडे सुस्तावला असून महामंडळ आर्थिकदृष्टय़ाही अडचणीत आले आहे. या गर्तेतून एसटीला बाहेर काढण्याची जबाबदारी विकास खारगे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.  
गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या नवी मुंबई महालिका आयुक्तपदी आपल्याच मर्जीतील अधिकाऱ्याची वर्णी लावून घेण्यात उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांना यश आले आहे. नगरपालिका संचालनालयाचे संचालक आबासाहेब जऱ्हाड यांची तेथे बदली करण्यात आली असून जऱ्हाड यांच्या जागी पुरूषोत्तम भापकर यांची बदली झाली आहे. तानाजी सत्रे यांची विमानतळ विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून तर राजेश कुमार यांची पाणी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. सोनिया सेठी यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी तर के. एच. गोविंदराज यांची राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे प्रमुख म्हणून बदली करण्यात आली आहे.
 त्याचप्रमाणे मुंबई महापालिका आयुक्त सीताराम कुंटे, गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मेधा गाडगीळ, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, वनविभागाचे सचिव प्रवीण परदेशी आदी आठ अधिकारी परदेश दौऱ्यावर चालले आहेत. त्यातच सनदी अधिकाऱ्यांच्या कमतरतेमुळे मंत्रालयात २० पेक्षा अधिक सचिवांवर अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. त्यामध्ये मुंबई महापालिका आयुक्तपदाचा अतिरिक्त कार्यभार राजीव जलोटा यांच्याकडे, सामन्य प्रशासन(सेवा)चा कार्यभार भगवान सहाय यांच्याकडे तर पर्यटन आणि सांस्कृतिक विभाग सुमित मलिक यांच्याकडे सोपविला आहे.