आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे मुंबई विद्यापीठाच्या अनेक परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात येणार होता. मात्र या बदलांमुळे विद्याविहार येथील के.जे.सोमय्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा देणाऱ्या आठ विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला आहे. परीक्षेच्या चुकीच्या वेळेमुळे आठ विद्यार्थी परीक्षेला मुकल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कॉलेज प्रशासनाने आता विद्यापीठाकडे धाव घेतलेली आहे.
सध्या मास कम्युनिकेशन अॅण्ड जर्नालिझम शाखेत पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू आहे. या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार शनिवारी माध्यम समीक्षा या विषयाची परीक्षा होती. ही परीक्षा विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील वेळापत्रकानुसार सकाळी ११ ते १ या वेळात होणार होती. मात्र निवडणुकांच्या कामामुळे अनेक परीक्षांचे वेळापत्रक बदलून ही परीक्षा ३ ते ५ या वेळात घेण्याचे विद्यापीठातर्फे सांगण्यात आले होते. तशी सूचना परीक्षा केंद्रावरील सूचना फलकावर लावण्यात आली होती. या केंद्रावर शनिवारी १० विद्यार्थ्यांची परीक्षा होणार होती. यापैकी दोन विद्यार्थी सकाळी ११ वाजता आले आणि त्यांनी प्रवेशपत्रावर वेळ ११ ते १ असल्यामुळे परीक्षा आत्ताच घ्या असे त्यांनी सांगितले. यानुसार केंद्रावर दोन विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू झाली. यामुळे दुपारी तीनची परीक्षा आहे असे समजून केंद्रावर पोहोचलेल्या आठ विद्यार्थ्यांना या परीक्षेस मुकावे लागले. या प्रकरणी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे धाव घेतली आहे. या संदर्भात महाविद्यालयाच्या प्राचार्य संगीता कोहली यांनी सांगितले की, या विद्यार्थ्यांची चार परीक्षा या ठिकाणी घेण्यात आल्या होता. त्यापकी शनिवारच्या परीक्षेदरम्यान हा गोंधळ झाला होता. मात्र आम्ही विद्यापीठाच्या वेळापत्रकानुसार ११ ते १ या वेळेत ही परीक्षा घेतलेली आहे. इतर दोन परीक्षेच्या वेळातही फरक पडला असून या वेळी या विद्यार्थ्यांना त्यांच्या मित्रांकडून प्रश्न कळले असल्याचा संशयही कोहली यांनी या वेळी व्यक्त केला आहे. या संदर्भात आम्ही प्र-कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांना पत्रव्यवहार केला असून मंगळवारी परीक्षा नियंत्रकांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2014 रोजी प्रकाशित
सोमय्या महाविद्यालयात ८ विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली
आगामी लोकसभा निवडणुकीच्या कामकाजामुळे मुंबई विद्यापीठाच्या अनेक परीक्षांच्या वेळापत्रकांमध्ये बदल करण्यात येणार होता.
First published on: 22-04-2014 at 03:31 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight miss exam amid chaos over change of schedule by mumbai university