भाषा संवर्धनासाठी विशेष पुरस्काराचीही घोषणा होणार
कविवर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून अख्या महाराष्ट्रात साजरा होणाऱ्या मराठी राज्यभाषा दिवशी दिला जाणाऱ्या ‘राज्य वाङमय पुरस्कार’ सोहळ्यात आठ विशेष ग्रंथांचे प्रकाशन होणार आहे. ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’तर्फे प्रकाशित होणाऱ्या ग्रंथांच्या यादीत संत साहित्याचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ज्ञ शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर यांचा ग्रंथ विशेष मानला जात आहे. या ग्रंथसंपदाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते.
येत्या २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिनानिमित्त राज्यभरातील नाटक, कांदबरी, कथा, ललितगद्य, एकांकिका, विनोद, चरित्र-आत्मचरित्र, समीक्षा आणि संपादन अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे. यावेळी ‘राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा’तर्फे आठ पुस्तके प्रकाशित होणार आहेत. या ग्रंथांच्या यादीत ‘मराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास’, राणा चव्हाण यांच्या लेखांचा संग्रह, खाद्यसंस्कृती कोश, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचे आत्मपर वाङमय दुसरा खंड (एकूण चार पुस्तके) आणि संत साहित्याचे अभ्यासक, शिक्षणतज्ज्ञ शं.वा तथा मामासाहेब दांडेकर यांच्यावर आधारीत ग्रंथ अशा एकूण आठ पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे.
दरम्यान यंदाच्या पुरस्कारात मराठी भाषा संवर्धनासाठी विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. मराठी भाषेची अविरत सेवा करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य व्यक्तींचाही समावेश केला जाऊ शकतो. राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री विनोद तावडे यांनी हा पुरस्कार सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे सुत्रांनी सांगितले. याशिवाय साहित्य अकादमी पुरस्कार(२०१५) प्रात्प साहित्यिकांचाही या सोहळ्यात सत्कार करण्यात येणार असल्याचे समजते.