राज्यातील वीजप्रकल्पांचे काम रखडल्याने त्यांचा खर्च तब्बल आठ हजार कोटी रुपयांनी वाढला आणि त्याचा भरुदड वीजदरवाढीच्या रूपात ग्राहकांवर टाकण्यात येतो. ‘महानिर्मिती’च्या प्रकल्प संचालकपदी २००९ मध्ये सी. एस. थोटवे यांची नियुक्ती झाली होती व त्यांच्या अनुभवहीन नेतृत्वामुळेच वीजप्रकल्पांना विलंब होत असल्याची टीका करत याप्रकरण कार्यवाही करण्याची मागणी भाजपाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी बुधवारी केली.
थोटवे यांची नेमणूक २००९ मध्ये ‘संचालक, प्रकल्प’ या पदावर झाली. पण थोटवे यांनी १९८९ ते २००६ हा कालावधी भांडार अधिकारी म्हणून काम केले आहे. वीजप्रकल्पांच्या उभारणीचा, तेथील कामाचा कसलाही अनुभव नसताना २००७ मध्ये आधी त्यांची ‘कार्यकारी संचालक’ म्हणून नियुक्ती झाली. नंतर २००९ मध्ये सुनील तटकरे ऊर्जामंत्री असताना ‘संचालक, प्रकल्प’ या पदावर वर्णी लागली. तब्बल २३,२१० कोटी रुपये खर्चाचे एकूण ५२३० मेगावॉटच्या प्रकल्पांचे काम ‘महानिर्मिती’तर्फे २००६ पासून हाती घेण्यात आले. यापैकी प्रत्येक प्रकल्प रखडला. जवळपास १२ महिन्यांपासून ते ३५ महिन्यांपर्यंत विलंब झालेला आहे. त्यामुळे एकूण ८६१६ कोटी रुपयांनी त्यांचा खर्च वाढला. वीजप्रकल्पाचा वाढीव खर्च ग्राहकांवर दरवाढीच्या रूपात टाकला जातो. त्यामुळे ‘महानिर्मिती’च्या अकार्यक्षमतेचा व तेथील अननुभवी अधिकाऱ्यांमुळे वीजग्राहकांना नाहक फटका बसत असल्याकडे भंडारी यांनी लक्ष वेधले.
थोटवे यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या. पण तरीही ‘महानिर्मिती’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून नेत्यांपर्यंत साऱ्यांनी त्यांना पाठीशी घातले. इतकेच नव्हे तर थोटवे यांच्या संचालक प्रकल्प पदावरील कार्यकाळाची मुदत मागच्या वर्षीच संपली. तरीही त्यांनाच तात्पुरता पदभार सोपवण्यात आला आहे. आता तर थोटवे यांना पुन्हा ‘संचालक, प्रकल्प’ पदावर नेमण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही भंडारी यांनी नमूद केले.
‘महानिर्मिती’ने मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. वीजप्रकल्प उभारणीचे काम जाणीवपूर्वक हेतूपुरस्सर रखडवले जात असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. वीजप्रकल्पांसाठी बॉयलर, टर्बाइन, जनरेटर पुरवण्याचे काम देशातील एकमेव पुरवठादार असलेल्या ‘भेल’ या कंपनीकडे देण्यात आले. पण त्यांच्याकडे देशातील अनेक प्रकल्पांचे हे काम आल्याने ‘भेल’कडून यंत्रसामुग्रीचा पुरवठा होण्यात विलंब झाला. त्याचबरोबर अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या पुरवठादारांची कमतरता असल्याने काहीवेळा विलंब झाला. त्यातूनच वीजप्रकल्प रखडले. आतापर्यंत ‘महानिर्मिती’ने २५०० मेगावॉटच्या प्रकल्पांचे काम पूर्ण केलेले आहे. तर ३२३० मेगावॉटच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे, असे ‘महानिर्मिती’ने म्हटले आहे. प्रकल्प विलंबामुळे खर्च किती वाढला हे मात्र ‘महानिर्मिती’ने स्पष्ट केलेले नाही.
प्रकल्प संचालकपदावरील नियुक्तीची प्रक्रिया सुरू आहे. तसेच संचालक, संचालन या पदासाठीही नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी कार्यकारी संचालक व्ही. पी. सिंग, कार्यकारी संचालक व्ही. एस. पाटील यांनी अर्ज केले आहेत. पैकी पाटील यांची मुदत पुढच्या आठवडय़ात संपत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eight thousand million loss due to power project stalled
First published on: 20-06-2013 at 03:28 IST