एकनाथ खडसे यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्या सर्व मंत्रिपदांचा राजीनामा दिल्यानंतर आता भाजपकडून त्यांची जागा घेणाऱ्या नेत्याचा शोध सुरू झाला आहे. यामध्ये अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचे नाव आघाडीवर आहे. खडसे यांच्यानंतर बहुजन चेहरा आणि विदर्भातील नेता असे दुहेरी समीकरण साधण्यासाठी मुनगंटीवार यांची निवड होणार असल्याची चर्चा आहे. येत्या १५ जुनला सुधीर मुनगंटीवार खडसे यांच्या महसूल खात्याची सूत्रे स्विकारणार असल्याचेही सांगितले जात आहे. खडसे यांच्याकडे महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्धविकास आणि मस्त्यपालन, अल्पसंख्यांक विकास आणि वक्फ बोर्ड या खात्यांचे मंत्री होते. त्यामुळे ही उर्वरित मंत्रिपदे कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, काँग्रेस नेते नारायण राणे यांनी खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपकडून बहुजन नेत्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप केला. खडसे हे भाजप पक्षातील आणि बहुजन समाजाचे मोठे नेते आहेत. त्यांची जागा इतर कोणताही नेता घेऊ शकत नसल्याचेही नारायण राणे यांनी म्हटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse place will be replaced by sudhir mungantiwar soon
First published on: 04-06-2016 at 14:23 IST