मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात जोरदार टोले लगावत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी थेट पहाटेच्या शपथविधीचा किस्सा सांगितला. तसेच त्यावेळी अजित पवारांनी घाई केली, असा खोचक टोला लगावला.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अजित पवारांनी मला श्रद्धा आणि सबुरीचाही सल्ला दिला आहे. मी कधी खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. माझा तो स्वभाव नाही. आम्ही जे केलं ते उघडपणे केलं. आम्ही श्रद्धा आणि सबुरीनेच वागतो आहे. आमच्यावर बाळासाहेब ठाकरेंचे आशीर्वाद आहेत आणि आनंद दिघेंवर आमची श्रद्धा आहे.”

“अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात”

“तुमचं वागणं, वेळापत्रक याविषयी आम्ही सगळीकडे बोलत असतो. अजित पवार सकाळी बरोबर वेळेवर येतात. तुम्ही मला एकदा पुण्याला सकाळी आठ वाजता बोलावलं. आता आठ वाजता मी कसा येणार? मी झोपतोच पहाटे चार वाजता. तुमच्याबद्दल मला आदरही आहे,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

“तुम्ही थोडं सबुरीने घेतलं असतं तर कार्यक्रम करेक्ट झाला असता”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “आम्ही श्रद्ध सबुरीनेच काम करतो आहे. तुम्ही त्यावेळी थोडी घाई केली. तुम्ही थोडं सबुरीने घेतलं असतं तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. जयंत पाटील यावर हसत आहेत. मला आठवतंय, जयंत पाटील म्हणाले होते की, चुकीचा कार्यक्रम झाला. मला माहिती दिली असती तर करेक्ट कार्यक्रम केला असता. त्यामुळे अजित पवारांनी थोडी घाई केली.”

“…तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला”

“पहाटेचा शपथविधी सुरू होता तेव्हा मला आमच्या प्रमुखांचा फोन आला आणि टीव्ही बघत आहे का विचारलं. मी टीव्ही पाहत होतो आणि अजित पवार शपथ घेत होते. मी म्हटलं हे मागचं कधीचं दाखवत आहेत की काय? त्यावर ते म्हणाले नाही, हे आताचंच आहे. तिथं देवेंद्र फडणवीस देखील दिसले. आमचे प्रमुख म्हटले मी जयंत पाटलांनाही फोन करतोय, ते फोन उचलत नाहीत. मी त्यांना म्हटलं जयंत पाटीलही तेथेच आहेत,” असं एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

पाहा व्हिडीओ –

“मला वाटलं जयंत पाटीलदेखील तेथे आहेत, मात्र…”

“अनिल पाटील तेथे पाठमोरे होते. मला वाटलं जयंत पाटीलदेखील तेथे आहेत. मात्र, जयंत पाटील तेथे नव्हते. ते असते तर कार्यक्रम करेक्ट झाला असता. ओके झाला असता,” असंही शिंदेंनी नमूद केलं.

“२५ वर्षे कोण टिकतो, आत राहतो, की बाहेर जातो कोण सांगू शकेल?”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “अजित पवार म्हणाले सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणीच आलेलं नाही. ते खरं आहे, कुणीच सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेलं नाही. शेवटी हे लोकांच्या हातात असतं. काही लोकं म्हणाली आम्ही २५ वर्षे सत्तेत राहणार आहे. २५ वर्षे कोण टिकतो, कोण कुठे जातो, आत राहतो, बाहेर जातो कुठे जातो कोण सांगू शकेल? आम्ही पुढील अडीच वर्षे चांगलं काम करू आणि त्यापुढील पाच वर्षे इकडेच राहू. आम्ही पुढील १०, १५, ५० वर्षांचं काहीही सांगणार नाही.”

हेही वाचा : “जयंतराव असं का करता, मी अख्खा मुख्यमंत्री…”, एकनाथ शिंदेंचं जयंत पाटलांना प्रत्युत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“फडणवीस पुन्हा येताना मलाही सोबत घेऊन आले”

“देवेंद्र फडणवीस म्हणाले पुन्हा येईन, पुन्हा येईन. ते पुन्हा आले, पण मलाही सोबत घेऊन आले. आता आम्ही दोघे दोघे आहोत. आधी फडणवीस एकटे सगळ्या विरोधी पक्षांना पुरून उरायचे. आता आम्ही दोघे आहोत. ‘एक से भले दो’. मनात दुसरं काही आणू नका, हे विधायक कामासाठी आम्ही दोघे असं म्हणत आहे,” असंही त्यांनी सांगितलं.