मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१ ऑगस्ट) मुंबईमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. या भेटीची फोटो समोर आल्यानंतर राज्यातील दोन्ही प्रमुख नेत्यांनी अचानक सरसंघचालकांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं. या भेटी दरम्यान दोन्ही नेत्यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुखांबरोबर जवळजवळ पाऊण तास चर्चा केली. या भेटीसंदर्भात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात असतानाच या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना दोन्ही नेत्यांनी भेटीत काय घडलं याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

नक्की पाहा >> Photos: दोन मंत्र्यांच्या ‘शिंदे सरकार’ची नकोश्या विक्रमाच्या दिशेने वाटचाल; CM म्हणून शिंदेच्या नावे होणार ‘हा’ नकोसा विक्रम?

मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना, “ही सदिच्छा भेट होती. काही विशेष औचित्य नव्हतं. आम्ही एमआयडीच्या एका कार्यक्रमाला होतो बीकेसीमध्ये. तिथून मी आणि उपमुख्यमंत्री एकत्र आलो,” असं सांगितलं. त्यानंतर पत्रकारांनी, “पाऊण तास चर्चा झाली. त्यामुळे एकूण…” असं म्हणत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता त्याला अर्ध्यात थांबवत शिंदे यांनी हसून, “काय चर्चा. काही विषय नाही,” अशी प्रतिक्रिया दिली.

नक्की वाचा >> “…कारण पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो”; संजय राऊतांचा उल्लेख करत निलेश राणेंनी केलेलं ‘ते’ ट्विट चर्चेत

शिंदे यांनी, “महत्वाचं असं की, ते आपल्यासाठी आदरणीय आहेत. त्यांना जेव्हा जेव्हा कधी भेटायची संधी मिळते मी भेटतो. ठाण्यातही एका कार्यक्रमात भेटलो होतो त्यांना. त्यामुळे कारण असं विशेष काहीच नाही सदिच्छा भेट आहे,” असं म्हटलं. आम्ही वेळोवेळी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची भूमिका मांडत आलो आहोत, असंही यावेळी शिंदे यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं.

उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या भेटीमध्ये सरसंघचालकांनी दोन्ही नेत्यांना काय सांगितलं हे सांगण्याबरोबरच या भेटीमागील कारणाबद्दलही खुलासा केला. “मुख्यमंत्र्यांना सरसंघचालकांची भेट घ्यायची होती. त्यानुसार आम्ही आज भेटीची वेळ घेतली होती. सरसंघचालक आज मुंबईत होते. त्यामुळे त्यांची भेट आणि आशीर्वाद घेतला. त्यांच्याशी चर्चा देखील केली,” असं फडणवीस म्हणाले.

नक्की वाचा >> शिंदे विरुद्ध ठाकरे: “४० आमदारांना बंडखोर ठरवून अपात्र ठरवल्यास…”; सुनावणीच्या आधीच शिंदेंचं न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र

पत्रकारांनी, “पाऊण तास चर्चा झाली. सतत शिवसेना-भाजपाची जी युती झाली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर झाल्याचं सांगितलं जातंय. सरसंघचालकांसोबत चर्चा झाली तेव्हा हिंदुत्व हा मुद्दा असेलच,” असं म्हणत फडणवीस यांना प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना फडणवीस यांनी, ” १०० टक्के हिंदुत्व हा मुद्दा आहेच. सरसंघचालकांनी आम्हाला एवढंच सांगितलं की चांगलं काम करा. सचोटीने काम करा. एकमेकांना सोबत घेऊन काम करा. तसेच हिंदुत्व हा तर आपला अजेंडा आहेच,” असं उत्तर दिलं.