मुंबई : जीवनाची संध्याकाळ अनुभवत असलेल्या ज्येष्ठांना कुणाची तरी सोबत मिळणे आणि तो अथवा ती सांगाती प्रशिक्षित व सुशिक्षित युवक-युवती असणे, याची केवळ  कल्पनाच सुखकारक, परंतु ती प्रत्यक्ष साकारणारा नवउद्यमी उपक्रम ‘गुडफेलोज्’ या नावाने सुरू झाला आहे. कुटुंब पद्धतीत दुर्मीळ बनलेल्या दोन पिढय़ांमधील मैत्रबंध जुळविणाऱ्या या नवउद्यमी  उपक्रमाची रुजुवात ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी गुंतविलेल्या बीजभांडवलातून झाली आहे.

ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एकटेपणापासून दिलासा देण्याचे महत्त्वाचे कार्य ‘गुडफेलोज्’ करते. रतन टाटा यांच्या कार्यालयाचे व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले शंतनू नायडू हे या उपक्रमाचे संस्थापक आहेत. मंगळवारी या उपक्रमाने टाटा यांच्या उपस्थितीत औपचारिक सुरुवात केली.

सहवेदनेची जाणीव आणि भावनांक या निकषांवर अत्यंत सखोल पारख करून ‘गुडफेलोज्’च्या भूमिकेसाठी तरुण, सुशिक्षित पदवीधरांची निवड केली जाते. ज्येष्ठांचे सांगाती म्हणून आणि कोणत्याही कामासाठी त्यांना खरीखुरी व अर्थपूर्ण सोबत करून त्यांचे एकटेपण घालवण्याचा ते प्रयत्न करतील. सुरुवात म्हणून सध्या मुंबईमध्ये २० ज्येष्ठ नागरिकांना ‘गुडफेलोज्’ सेवा देत असून लवकरच विविध शहरांमध्ये कंपनीची विस्तार करण्याची योजना आहे. उल्लेखनीय म्हणजे ‘गुडफेलोज्’ म्हणून रुजू होण्यास इच्छुक ८०० हून अधिक युवा पदवीधरांचे अर्ज कंपनीकडे आले आहेत.

पुढील टप्प्यात पुणे, चेन्नई आणि बंगळूरु येथे सेवा सुरू करण्यात येणार असून त्या माध्यमातून ३०० ते ४०० ज्येष्ठ नागरिकांना सेवा देण्यात येईल, अशी माहिती नायडू यांनी दिली. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी विविध गेल्या काही वर्षांत ५० हून नवउद्यमी उपक्रमांमध्ये गुंतवणूक केली असून, ‘गुडफेलोज्’ त्यापैकीच एक आहे.

‘गुडफेलोज्’ किती शुल्क आकारणार?

एक ‘गुडफेलोज्’ सांगाती आठवडय़ातून तीनदा नियुक्त ज्येष्ठांची भेट घेईल आणि एका भेटीत त्यांच्यासोबत चार तास व्यतीत करेल. पहिल्या महिन्यात ज्येष्ठ नागरिकांकडून कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. मात्र दुसऱ्या महिन्यापासून निवृत्तिवेतनधारक ज्येष्ठांच्या आर्थिक स्तरानुसार शुल्क आकारले जाईल.

गुडफेलोज् दोन पिढय़ांमध्ये निर्माण करू पाहात असलेला स्नेहबंध अतिशय अर्थपूर्ण आहे आणि भारतातील एक महत्त्वाच्या सामाजिक प्रश्नावर ते उत्तरही ठरेल,अशी मला आशा आहे. 

– रतन टाटा