मतदार याद्या करण्याची जबाबदारी पदाधिकाऱ्यांकडे; कसूर केल्यास सरकार जाब विचारणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘बिनपगारी फुल रोजंदारी’ म्हणून कारभार चालविणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना आता निवडणुकीचीही कामे करावी लागणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात मुदत संपणाऱ्या मुंबई- ठाण्यासह १५ महापालिका, २६ जिल्हा परिषदा आणि २९६ पंचायत समित्यांसाठी लवकरच निवडणुका होणार आहेत. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याची मोहीम राज्य निवडणूक आयोगाने सुरू केली असून प्रथमच ही जबाबदारी सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या माथी मारली आहे. त्यात कसूर केल्यास संस्थेच्या वार्षकि लेखापरीक्षण अहवालात त्याची नोंद करून संबंधित पदाधिकाऱ्यांना सरकारकडून जाबही विचारला जाणार आहे.

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सहकार विभागाने सरकारला असलेल्या विशेषाधिकाराचा वापर करीत सप्टेंबर २०१४ मध्ये एक आदेश काढून निवडणूक आयोगाच्या सर्व कामांत सहभागी होण्यासाठी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना ‘मतदान केंद्रस्तरीय स्वयंसेवक’ म्हणून घोषित केले आहे. मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मोहिमेत तसेच छायाचित्र मतदार याद्यांच्या वार्षकि पुनर्निरीक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याची या पदाधिकाऱ्यांवर सक्ती करण्यात आली आहे. शिवाय संस्थेचे अध्यक्ष आणि सचिव यांनी मतदान नोंदणी अधिकाऱ्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०च्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडण्यास लागणारे सहकार्य करावे, असेही निर्देश देण्यात आले होते. मात्र त्याची आजवर अंमलबजावणी झालेली नव्हती. या वेळी मात्र या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून मतदार नोंदणी आणि मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आदेश गृहनिर्माण संस्थांना द्यावेत, असे निर्देश आयोगाने सरकाराला दिले आहेत.

राज्यातील आठ कोटी लोकसंख्या या निवडणुकीच्या टप्प्यात येणार असल्याने जास्तीत जास्त लोकांनी मतदार यादीत नाव नोंदवावे यासाठी विद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणीची व्यवस्था करण्यात आली आहे. ज्यांचे वय १ जानेवारी २०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण होणार आहे त्यांनी व नाव नोंदविणाऱ्या कोणासही १४ ऑक्टोबरपूर्वी मतदार यादीत नाव नोंदविल्यास त्यांना मतदानाचा हक्क बजावता येईल. त्याचप्रमाणे तहसीलदार कार्यालय, पालिका प्रभाग कार्यालय, मतदान केंद्र याठिकाणीही मतदार यादीत नावे नोंदविण्याची सोय करण्यात आली आहे.

४० हजार गृहनिर्माण संस्थांचा सहभाग

या मोहिमेत गृहनिर्माण संस्थांनी सहभागी व्हावे याबाबत सहकार विभाग आणि महापालिका सर्व सोसायटय़ांना पत्र पाठविणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त  ज. स. सहारिया यांनी दिली. मुंबई- ठाणे परिसरात सुमारे ४० हजार गृहनिर्माण संस्था असून या चांगल्या उपक्रमात सर्व सोसायटय़ांनी सहभागी व्हावे अशी आमची विनंती असल्याचेही सहारिया यांनी बुधवारी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election works from cooperative housing societies
First published on: 29-09-2016 at 01:05 IST