मुंबई म्हणजेच तेव्हाच्या बॉम्बे प्रांतात राज्य पुनर्रचनेनंतर १९५६ मध्ये कच्छ आणि सौराष्ट्र, मध्य प्रांतातील नागपूर, हैदराबादमधील मराठवाडा हा भाग जोडण्यात आला होता. यामुळेच १९५७च्या विधानसभा निवडणुकीत सदस्यसंख्या ३१५ वरून ३९६ वर गेली होती. काही मतदारसंघ त्रिसदस्यीय तर काही द्विसदस्यीय मतदारसंघ होते. मराठी भाषिक स्वतंत्र राज्यासाठी तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू झाली होती. या चळवळीचे पडसाद १९५७च्या विधानसभा निवडणुकीत उमटले. मुंबई प्रांताच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने ३१५ पैकी २६९ जागा जिंकून एकतर्फी यश मिळविले होते. पण दुसऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे संख्याबळ २३४ पर्यंत घटले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संयुक्त महाराष्ट्र समिती आणि प्रजा समाजवादी पार्टीने जवळपास १०० जागा जिंकल्या होत्या. मोरारजी देसाई यांच्या सरकारने मराठी भाषक राज्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर केलेल्या गोळीबारात १०५ जण हुतात्मे झाले होते. याची तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. १९५७च्या निवडणुकीत यातूनच संयुक्त महाराष्ट्र समितीने काँग्रेसला चांगलाच दणका दिला होता. मुंबई, कोकण, काही प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र समिती आणि प्रजा समाजवादी पक्षाला चांगले यश मिळाले होते. पण गुजरात, विदर्भ आणि मराठवाडय़ात काँग्रेसलाच यश मिळाले. या जोरावरच काँग्रेसने सरकार स्थापन केले होते.

संख्याबळ

काँग्रेस – २३४

प्रजा समाजवादी पार्टी – ३६

शेकाप – ३१

शेडय़ुल कास्ट फेडरेशन – १३

भारतीय कम्युनिस्ट पार्टी – १३

भारतीय जनसंघ – ४

अखिल भारतीय हिंदू महासभा  – १

अपक्ष – ६४

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elections of 1957 the combined maharashtra samitis attack abn
First published on: 10-07-2019 at 01:43 IST