ऑनलाइन खरेदी, ग्राहकांच्या क्रयशक्तीत घट झाल्याचा परिणाम
मुंबई : दसऱ्याच्या पूर्वसंध्येलाही इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या बाजारात मरगळ असल्याचे चित्र गुरुवारी पाहायला मिळाले. आकर्षक सवलती जाहीर करूनही ग्राहक येत नसल्याने दुकानदार चिंतेत आहेत. एकीकडे करोनाकाळात बदललेल्या गरजांचा ग्राहकांच्या क्रयशक्तीवर विपरीत परिणाम झाल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे, तर दुसरीकडे ऑनलाइन खरेदीकडे ओढा वाढत चालल्याचा फटकाही बाजारपेठेला बसत आहे.
करोनाचे निर्बंध शिथिल झाल्याने दसऱ्याच्या तोंडावर अन्य बाजारांत गजबज दिसत असली तरी, इलेक्ट्रॉनिक्स बाजारांतील महागड्या वस्तूंच्या खरेदीकडे अद्याप अपेक्षेप्रमाणे ग्राहक वळलेला नाही. एरव्ही, दसऱ्याच्या काही दिवस आधीपासूनच गजबजणाऱ्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानांत गुरुवारी शुकशुकाट दिसून येत होता. स्थानिक दुकानांप्रमाणेच मोठमोठ्या ब्रॅण्ड स्टोअर आणि रिटेल दुकानांमध्येही ग्राहकांची गर्दी मर्यादित होती.
‘टीव्ही, फ्रीज, एसी, वरॉंशग मशीन, ओव्हन अशा गृहोपयोगी उपकरणांना दसऱ्याला मोठी मागणी असते. सकाळपासून ग्राहक येतील अशी आशा होती, पण फारसे ग्राहक दुकानाकडे फिरकलेच नाहीत. करोनापूर्व काळाच्या तुलनेत आज १५ ते २० टक्के ग्राहकही आले नाहीत,’ असे ‘क्रोमा’ स्टोअरच्या प्रतिनिधींनी सांगितले. ‘दीड वर्षाच्या करोनाकाळात नागरिकांच्या गरजा बदलल्या आहेत. नुकतीच परिस्थिती सुधारत असल्याने महागड्या वस्तू खरेदी करण्याची ग्राहकांची तयारी नसावी. दिवाळीपर्यंत कदाचित ग्राहकांची क्रयशक्ती सुधारेल,’ असा अंदाज काही व्यापाऱ्यानी व्यक्त केला.
दसऱ्याच्या निमित्ताने ग्राहकांना अनेक सवलती दिल्या आहेत. त्यात पाच ते दहा टक्के कॅशबॅक, वॉरंटीमध्ये वाढ, काही भेटवस्तू आणि कंपनीनुसार अनेक सवलतींचा समावेश आहे. तरीही ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत कमी आहे. ग्राहक गुरुवारी फिरकले नसले तरी शुक्रवारी दसऱ्याच्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळेल अशी आशा आहे. – गिरीश मट्टा, प्रतिनिधी, विजय सेल्स