मुंबई उपनगरीय रेल्वेतील वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान लोहमार्ग पोलिसांसमोर आहे. कमी मनुष्यबळातही महिला प्रवाशांची सुरक्षा करणे, अपघातग्रस्तांना मदत करणे, गुन्ह्य़ांचा उलगडा करणे, प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करणे यात लोहमार्ग पोलिसांची कसोटी लागत आहे. त्यामुळे आता या आव्हानाला तोंड देण्यासाठी लोहामार्ग पोलीस दल आधुनिकीकरणाचीही कास धरत आहे. गेल्या काही वर्षांत महिला प्रवाशांबाबतीत घडणारे गुन्हे पाहता त्यांच्या सुरक्षेबाबत मोठे फे रबदलही के ले जाणार असून ही सुरक्षा अधिक भक्कम करण्यावर लक्ष के ंद्रित के ले आहे. या सर्व मुद्दय़ांवर लोहमार्ग पोलीस आयुक्त कै सर खालीद यांच्याशी के लेली चर्चा.

आठवडय़ाची मुलाखत : कै सर खालीद, लोहमार्ग पोलीस आयुक्त

मुंबई उपनगरीय रेल्वेतून दर दिवशी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लाखोंच्या घरात आहे. त्यांची सुरक्षा राखताना काही समस्या येतात का?

मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाची हद्द मोठी असून ती मुंबई ते गुजरात सिमेपर्यंत, मुंबई ते कसारा, मुंबई ते खोपोली, मुंबई ते पनवेल यांना जोडणाऱ्या सर्व जोडमार्गापर्यंत आहे. ज्यात लांब पल्ल्यांच्या तसेच उपनगरीय रेल्वेसेवा कार्यान्वित आहे. त्यात सामान्य परिस्थितीमध्ये दररोज ८० ते ८५ लाखांपर्यंत प्रवाशी प्रवास करतात. एवढे जास्त लोक मर्यादित वेळेमध्ये येणे, प्रवास करणे व सुखरूप आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहोचणे हे कायदा व सुव्यवस्था तसेच गुन्हे अपराध नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून मोठे आव्हान आहे. त्यातही महिलांची सुरक्षितता अधिक आव्हानात्मक आहे. याखेरीज रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सापडणाऱ्या बेपत्ता मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुखरूपपणे सोपवण्याचे कामही रेल्वे पोलिसांना करावे लागते. रूळ ओलांडताना होणारे अपघात रोखणे आणि अपघातग्रस्तांना वेळेत मदत पोहोचवणे, याची जबाबदारीही लोहमार्ग पोलीस पेलत असतात.

’ लोहमार्ग पोलिसांच्या अपुऱ्या मनुष्यबळाचा प्रश्न मोठा आहे. तो सोडवण्यासाठी काही प्रयत्न?

गेल्या ३० ते ४० वर्षांमध्ये प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून लोकल फे ऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. त्या तुलनेत रेल्वे पोलीस बळाच्या संख्येमध्ये वाढ झाली नाही. रेल्वे पोलिसांवर होणारा खर्च हा केंद्र व राज्य शासनाकडून ५०-५० टक्के  या प्रमाणात पुरविण्यात येत असल्याने संख्याबळ वाढविण्यासाठी केंद्र शासनाचीही परवानगी लागत असते. समोर असलेले आव्हान लक्षात घेवून राज्य शासनाने मनुष्यबळ वाढवण्यासाठी होमगार्डकडून २००० व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून २०० मनुष्यबळ पुरविण्याचे आदेश काढलेले आहेत. मनुष्यबळ उपलब्धता, नियोजन, अपघाताबद्दल माहिती व पर्यवेक्षण, गुन्हेगारांची ओळख व रेकॉर्ड तपासणी, हद्दपार करण्यात आलेल्या व्यक्तींच्या ठावठिकाणाबद्दल माहिती हे असे मुद्दे आहेत, ज्यासाठी रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पोलिसांची कार्यक्षमता वाढविण्याचे काम प्रगतीवर आहे. यामुळे सध्या मनुष्यबळावर असलेला ताणतणावही कमी होणार असून त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी घाटकोपरमधील रेल्वे पोलीस मुख्यालय येथे चिकित्सालयाचे आधुनिकीकरण सुरू असून त्याठिकाणी लवकरच विविध प्रकारच्या खेळांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची खेळाची मदाने, ट्रॅक इत्यादींचे निर्माण प्रगतिपथावर आहे. लोहमार्ग पोलिसांच्या समुपदेशनासाठी वेळोवेळी स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ यांची मदत घेतली जाते.

’ महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सध्या काय नियोजन?

महिला सुरक्षा हा रेल्वे पोलिसांसाठी महत्त्वाचा विषय असून ही सुरक्षा अधिक सक्षम करण्यात येत आहे. त्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये रात्री नऊ नंतर सुटणाऱ्या सर्व लोकल्सच्या महिला डब्यामध्ये रेल्वे पोलीस नेमले जात असून सध्या या योजनेच्या पुनर्वलिोकनाचे कार्य चालू आहे. यामध्ये वेळ व ठिकाणांत कुठल्या प्रकारची सुधारणा करणे योग्य आहे, याचे विश्लेषण सुरू आहे. याव्यतिरिक्त महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर गुन्हेगारांची ओळख पटविणारी सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याची मंजुरी मिळाली असून ते कामही लवकरच सुरू होणार आहे. २४ तास कार्यरत असणारी रेल्वे पोलीस हेल्पलाइन १५१२ त्यालाही प्रसिद्धी देवून प्रत्येक महिला प्रवाशांपर्यत पोहोचण्याची योजना आखण्यात आली आहे. त्याबद्दलही कार्यवाही सुरू आहे. गुन्हेगारांना आळा बसावा यासाठी मागच्या १० वर्षांमध्ये सक्रिय असलेल्या अपराध्यांचे विश्लेषण सुरू आहे. त्या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर २७  महिला डब्यांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर डब्यामध्ये पॅनिक बटनाची व्यवस्था करण्यात आली असून ते बटन दाबल्याने प्रवाशाला तात्काळ गार्ड किंवा मोटरमन सोबत संवाद साधता येईल व त्या लोकांकडे उपलब्ध असलेल्या वायरलेस सिस्टीममधून पोलिसांना तात्काळ माहितीही मिळू शकेल.

’ रेल्वे हद्दीतील गुन्ह्य़ांना आळा कसा बसेल?

रेल्वेमध्ये असलेली अफाट गर्दी, प्रवाशांची घाई, स्थानकातून येण्या-जाण्यासाठी असलेले भरपूर मार्ग इत्यादीसारख्या कारणांमुळे शहरापेक्षा रेल्वेमध्ये गुन्हे करणे खूप सोपे आहे. तरीही मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत घडणाऱ्या गुन्ह्य़ांचे उघडकीस आणण्याचे प्रमाण राज्यातील सर्व पोलीस घटकांपेक्षा जास्त आहे. रेल्वेमध्ये घडणाऱ्या गुन्ह्य़ाच्या जवळजवळ ८० टक्के गुन्हे मोबाईल चोरीचे असतात.अशा गुन्हयाला आळा बसावा व गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शक्य व्हावे यासाठी जवळजवळ सर्व रेल्वे स्टेशनवर सीसीटीव्हीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्थानिक व काही स्थानके मिळून या पातळीवर नियंत्रण कक्षही प्रस्थापित करण्यात आलेला आहे. त्यातून गुन्हेगारांची ओळख पटविणे शक्य झालेले आहे. या यंत्रणेचे आधुनिकीकरणाचे काम चालू असून भविष्यात त्यात आर्टििफशियल इंटेलिजन्सव्दारे गुन्हेगार हद्दीत शिरल्यास नियंत्रण कक्षाकडे याबद्दल अलर्ट मिळण्याची व्यवस्थाही करण्यात येईल.

’ लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारीसाठी येणाऱ्यांची तक्रार घेण्यास बराच वेळ जातो..

रेल्वे पोलीस आयुक्तालयात तक्रार दाखल करुन घेणे हे अतिशय सोपे झाले असून मागच्या पाच वर्षांत प्राप्त तक्रारीच्या तुलनेत गुन्हे नोंदणीचे प्रमाण १०० टक्के  आहे. पोलीस ठाणे स्तरावर कोणतीही तक्रार दाखल केल्याशिवाय तक्रारदारांना परत पाठविण्यात येवू नये यासाठी कटिबद्ध आहोत. तरीही घडणाऱ्या गुन्हयांचे प्रमाण बघता सामान्य परिस्थितीमध्ये मोठया पोलीस ठाण्यात दररोज १० ते २० गुन्ह्य़ांची खबर प्राप्त होतात. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सद्य:स्थितीत पूर्णपणे ऑनलाइन झाल्याने व त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्याकडे एकच लॉगइन आयडी असल्याने गुन्हे रजिस्टर करण्यामध्ये वेळ लागतो. लोकांना होणारी गरसोय दूर व्हावी यासाठी आता आम्हाला अजून एक लॉगइन आयडी मिळावा याकरिता पाठपुरावा चालू असून तो मिळाल्यास गुन्हे रजिस्टर करण्याचा वेग निश्चितच वाढेल. नोंदीसाठी लागणारा वेळ कमी करण्यासाठी सद्य:स्थितीत गुन्हा रजिस्टेशनचा फॉर्म ऑफलाइन भरून त्याला लवकरात लवकर ऑनलाइन कसा रजिस्टर करता येईल यासाठी प्रयत्नशील आहोत.