दुकानात अवघ्या २० ते ४० रुपयांना उपलब्ध; कोटय़वधींचा खर्च वाया
‘प्रगत शैक्षणिक कार्यक्रमा’अंतर्गत दुसरी ते आठवी इयत्तांसाठी घेण्यात येणाऱ्या इंग्रजी व गणित या विषयांच्या चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका मुंबईत ठिकठिकाणी फोटोकॉपी करणाऱ्या व्यावसायिकांकडे आदल्या दिवशीच विकल्या जात आल्याचे उघडकीस आले आहे.
गुरुवारी होणाऱ्या ‘गणित’ या विषयाची प्रश्नपत्रिका ‘लोकसत्ता’च्या हाती लागली आहे. या प्रकारामुळे महाराष्ट्र शैक्षणिकदृष्टय़ा ‘प्रगत’ व्हावा यासाठी २५ कोटी रुपये खर्चून शालेय शिक्षण विभागातर्फे राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचा बट्टय़ाबोळ झाला आहे.
मुंबईतील भायखळा, आग्रीपाडा, नागपाडा या ठिकाणी शाळांसमोरील फोटोकॉपी व्यावसायिकांकडून उघडउघड या प्रश्नपत्रिकांची विक्री केली जात असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. ‘बुधवारी इंग्रजी विषयाची चाचणी घेण्यात आली, परंतु आदल्या दिवशीच या विषयाची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना फोटोकॉपीच्या दुकानांमधून उपलब्ध झाली होती. येथे दुसरी ते आठवीपर्यंतच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत,’ असा दावा आग्रीपाडय़ातील शाळेत शिकणाऱ्या एका सात वर्षांच्या विद्यार्थिनीचे वडील शंकर भिलारे यांनी केला. गुरुवारी होणाऱ्या गणित या विषयाची प्रश्नपत्रिकाही अवघ्या २० रुपयांना विकली जात असल्याचा दावा त्यांनी केला. त्यांनी पाठविलेली प्रश्नपत्रिका ‘लोकसत्ता’कडे आहे.
‘इतर विद्यार्थ्यांप्रमाणे माझ्या मुलीनेही शाळेसमोरील दुकानातून इंग्रजीची प्रश्नपत्रिका विकत घेतली. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि बुधवारी झालेल्या परीक्षेतील प्रश्न सारखेच होते,’ असे भिलारे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या हाती जर आदल्याच दिवशी प्रश्नपत्रिका येत असतील, तर चाचण्यांचे महत्त्व काय, असा प्रश्न हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक आणि राज्याच्या शिक्षण मंडळाचे माजी सदस्य उदय नरे यांनी केला. या संपूर्ण कार्यक्रमावर सुमारे २५ कोटींच्या आसपास खर्च करण्यात येतो. करदात्यांच्या पैशाचा हा चुराडा आहे, असा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, यासंदर्भात परिषदेचे संचालक गोविंद नांदेडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांची प्रतिक्रिया उपलब्ध होऊ शकली नाही.
नियोजनात अप्रगत
गेल्या वर्षीपासून राज्यभरात सुरू झालेल्या या कार्यक्रमात इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांकरिता वेगवेगळ्या टप्प्यांवर चाचण्यांचे आयोजन केले जाते. ‘महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद’ या शालेय शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या यंत्रणेच्या देखरेखीखाली गणित आणि इंग्रजी या दोन भाषांकरिता या चाचण्या घेतल्या जातात. परिषदेतर्फे दोन दिवस आधी या प्रश्नपत्रिकांचे गठ्ठे शाळांना पुरविले जातात, परंतु पहिल्या वर्षांपासूनच या चाचण्यांच्या आयोजनात योग्य नियोजनाअभावी अनंत अडचणी येत आहेत. त्यात या चाचण्यांच्या आधारे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या आलेखाचीही सरकारदरबारी नोंद होणार असल्याने शाळा यात आपल्या परीने करता येईल तितकी ‘प्रगती’ दाखवितात. त्यासाठी आदल्या दिवशीच विद्यार्थ्यांना प्रश्न सांगणे किंवा सर्रास प्रश्नपत्रिका पुरविणे असे प्रकार केले जातात.