मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’साठी आरे वसाहतीत उभारण्यात येणाऱ्या कारशेडविरोधात वसाहतीमधील पिकनिक पॉइंट परिसरात पर्यावरणप्रेमींनी रविवारी (२१ ऑगस्ट) राज्य सरकारचा निषेध करीत धरणे आंदोलन केले. आंदोलनाचा हा आठवा आठवडा असून या आंदोलनात रिपब्लिकन सेनेनेही सहभाग घेतला असून आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘आरे वाचवा’ हाक देत कार्यकर्ते रस्त्यावर उतरले.

राज्य सरकारने ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ची कारशेड आरे वसाहतीत हलविण्याचा निर्णय घेतल्यापासून दर रविवारी आरे वसाहतीमधील पिकनिक पॉइंट परिसरात ‘आरे संवर्धन गटा’कडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यानुसार या रविवारीही आंदोलन करण्यात आले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानाबाहेर आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात पर्यावरणप्रेमीही सहभागी होणार होते. मात्र आंदोलन होण्यापूर्वी पोलिसांनी काँग्रेसच्या नेत्यांना ताब्यात घेतले. त्यामुळे ठाण्याच्या दिशेने निघालेल्या अनेक पर्यावरणप्रेमींनी मोर्चा पुन्हा आरेच्या दिशेने वळवला.

आरे आंदोलकांशी चर्चेची तयारी – सामंत

कुलाबा: वांद्रे-सिप्झ मेट्रो-३च्या आरे कारशेडला विरोध करणाऱ्या आंदोलकांशी सरकार चर्चा करणार असून त्यातून पर्यावरणवाद्यांचा गैरसमज दूर होईल असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान १२ हजार हेक्टरवर विस्तारलेले असून त्यातील केवळ ३० हेक्टर जागेवर मेट्रो-३चे कारशेड होणार आहे. या जागेच्या तिन्ही बाजूला रस्ते आहेत. मुळात ही जागा दुग्धविकास विभागाची होती, वन विभागाची नव्हती. परंतु, त्याबाबत सुरुवातीपासूनच जाणते – अजाणतेपणी संभ्रम निर्माण करण्यात आल्याचे ते म्हणाले.  आरेमधील कारशेडच सर्वार्थाने व्यवहार्य असल्याचा तज्ज्ञांचा अहवाल आहे. मुंबईतील १७ लाख प्रवासी या मार्गिकेवर प्रवास करणार आहेत. ही मेट्रो सेवा सुरू झाल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होणार असून प्रदूषणातही घट होईल. कारशेडमुळे सभोवतालच्या पर्यावरणास कोणताही धोका निर्माण होणार नाही याचीही काळजी युती सरकार घेईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.

२४ ऑगस्ट रोजी सुनावणी..

आरे कारशेडविरोधातील याचिकांवर १० ऑगस्टला सुनावणी होणार होती. मात्र आता ही सुनावणी २४ ऑगस्ट रोजी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या संदर्भ सूचीमध्ये तशी नोंद असून पर्यावरणप्रेमीचे लक्ष या सुनावणीकडे लागले आहे.कारशेडविरोधात  आरे वसाहतीमधील पिकनिक पॉइंट परिसरात  पर्यावरणप्रेमींनी रविवारी आंदोलन केले.