मुंबई: राज्य पोलिसांच्या गस्ती नौकांच्या देखभालीच्या नावाखाली झालेल्या फसवणूकप्रकरणी आता मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा तपास करणार आहे. याप्रकरणी सव्वासात कोटींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली तीन नौका निर्मिती (शिपयार्ड) कंपन्यातील अधिकाऱ्यांविरोधात शिवडी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. ते प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आले आहे. अतिरिक्त महासंचालक सुनील रामानंद (माहिती तंत्रज्ञान व परिवहन विभाग, पुणे ) यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण शिवडी रे रोड येथील पोलीस नौका विभाग, लकडा बंदर हद्दील घडल्यामुळे याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेला वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. कार्यादेशानुसार नौकांचे जुने इंजिन बदलून निर्मात्याकडून घेतलेले नवीन इंजिने बसवणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात परदेशातून खरेदी केलेली जुनी इंजिन बसविण्यात आली आणि नवीन इंजिन बसवल्याच्या पावत्या सादर करण्यात आल्या. त्याबदल्यात मोबदला स्वीकारून सात कोटी २३ लाखांची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत हा प्रकार उघड झाला होता.