कांजूरमार्गला मृतदेह सापडलेल्या संगणक अभियंता इस्टर अनुह्य़ा हिच्या हत्या प्रकरणात पोलिसांचा संशय रिक्षाचालकांवरच असून त्या दृष्टीनेही तपास सुरू आहे. शक्ती मिल सामूहिक बलात्कार प्रकरणासारखे साधम्र्य या प्रकरणात पोलिसांना दिसत आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ५ जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या इस्टर अनुह्य़ा (२३) या तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह ११ दिवसांनंतर कांजूरमार्ग महामार्गाजवळील खाडीजवळ सापडला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास कांजूर पोलिसांसह गुन्हे शाखेचे विविध कक्षही करत आहे.
आम्ही सर्व शक्यता पडताळून तपास करत आहोत. पण आता ‘ट्रान्सपोर्ट’ हाच धागा आम्हाला महत्त्वाचा वाटतो. म्हणजे ती ज्या वाहनातून गेली असावी त्यानेच हे कृत्य केल्याची दाट शक्यता आहे, अशी माहिती गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी दिली. आम्ही परिसरातील सर्व रिक्षा, टॅक्सीचालकांची, नियमित येणाऱ्या वाहनचालकांची कसून चौकशी सुरू केली आहे. तिच्या अंगावर पेट्रोल किंवा डिझेल टाकण्यात आले होते. ते रिक्षाचालकांकडे नेहमी बाटलीत असते. त्यामुळे ही शक्यता बळावली आहे. स्थानकाच्या बाहेर कुठले खासगी वाहन आले होते का, त्याचाही तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ज्या प्रकारे निर्जन जागेत नेऊन तिला मारण्यात आले आहे, ते पाहता हा प्रकार शक्ती मिलमध्ये घडलेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाशी साधम्र्य असल्यासारखा वाटतो, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले. एकापेक्षा अनेक व्यक्तींचा या गुन्ह्य़ात सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.
..तर तिचे प्राण वाचले असते
 ही गेल्या दीड वर्षांपासून मुंबईत काम करून राहात होती. तिचे अनेक नातेवाईक मुंबईत होते. त्यामुळे मुंबई तिला नवखी नव्हती. मुंबईत येताना एरवी ती दादर स्थानकात उतरायची. पण पहिल्यांदाच ती लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात उतरली होती. त्यामुळे हे स्थानक तिला नवीन होते. गाडी येण्याची वेळ पहाटे ५ची होती. त्यामुळे जर कुणी तिचे नातेवाईक तिला घ्यायला आले असते किंवा किमान घरचा वाहनचालक जरी पाठवला असता तरी ही घटना घडली नसती असे पोलिसांनी सांगितले. आता ज्या प्रकारे तिचे नातेवाईक धडपड करत आहे, त्यापेक्षा त्यांनी तिला त्या दिवशी स्थानकातून नेण्यासाठी कुणाला तरी पाठवायला हवे होते, असेही पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.