इस्थर अनुह्य़ा या बेपत्ता तरुणीच्या मारेकऱ्याच्या शोधासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. परंतु ती बेपत्ता झाल्यानंतर चार दिवसांनी म्हणजे ९ जानेवारी रोजी तिचा मोबाईल फोन सुरू झाला होता, अशी माहिती तपासात पुढे आली आहे.
अभियंता इस्थर ५ जानेवारी पासून लोकमान्य टिळक टर्मिनस येथून बेपत्ता होती. १६ जानेवारी रोजी कांजूर महामार्गाजवळील झुडपात तिचा कुजलेला मृतदेह सापडलेला होता. घटनास्थळाजवळ तिचा मोबाईलही सापडला होता. ५ जानेवारी रोजी सकाळी पाचच्या सुमारास ती लोकमान्य टिळक टर्मिनस येथे उतरली तेव्हापासून तिचा मोबाईल सुरू होता. दुपारी ३ वाजता तो बंद पडला. तेव्हा त्याचे टॉवर लोकेशन भांडूप पूर्व दाखवत होते. त्यानंतर मात्र तिचा फोन बंदच होता. परंतु ९ जानेवारी रोजी तिचा मोबाईल फोन काही वेळासाठी सुरू असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत.
याबाबत माहिती देताना गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कांजूर मिठागराजवळच्या त्या पडीक जागेवर चरसी, कचरा वेचणारे जात असतात. त्यापैकीच कुणाला तरी हा मोबाईल पडलेला दिसला असावा. त्याने तो सुरू केला असेल पण त्याचवेळी इस्थरचा मृतदेहसुद्धा दिसल्यानंतर तो फोन टाकून पळून गेला असावा.
..त्या मंदिरातील दिवाबत्ती बंद
घटनास्थळाजवळ काही अंतरावर एक छोटे मंदिर आहे. एरवी तिथे दिवाबत्ती असते. पण त्या घटनेनंतर तेथील दिवाबत्ती बंद झाली आहे. या ठिकाणी कोण दिवाबत्ती करण्यासाठी येत होते आणि त्याने अचानक ती का बंद केली ते सुद्धा पोलीस तपासत आहेत. पोलिसानी बुधवारीसुद्धा अनेक टॅक्सी आणि रिक्षाचालकांची कसून चौकशी सुरू होती. इस्थरचा फोन तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.