scorecardresearch

गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठांत गजबज कमीच

गणेशोत्सवाच्या तोंडावर गाजबाजणाऱ्या मुंबईतील बाजारपेठांमध्ये यंदा ग्राहकांची किरकोळ लगबग दिसत आहे.

गणेशोत्सवाच्या तोंडावर बाजारपेठांत गजबज कमीच

दरवर्षीपेक्षा यंदा ग्राहकांची कमी संख्या, विक्रे त्यांचा हिरमोड; लोकल प्रवासावरील निर्बधांमुळे ग्राहक कमी

मुंबई : गणेशोत्सवाच्या तोंडावर गाजबाजणाऱ्या मुंबईतील बाजारपेठांमध्ये यंदा ग्राहकांची किरकोळ लगबग दिसत आहे. दोन लसमात्रा न घेतलेल्या सर्वसामांन्यांना अद्याप लोकल प्रवासास परवानगी नसल्याने ग्राहकवर्ग आटला आहे. मुंबईभरातून येणारा ग्राहक यंदा दादर आणि लालबागसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठांकडे फिरकला नसल्याने ६० ते ७० टक्के नुकसान झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

गणेशोत्सव जवळ आला की मुंबईतील बहुसंख्य नागरिक विविध वस्तूंच्या खरेदीच्या निमित्ताने दादर आणि लालबागमधील बाजारपेठांमध्ये हमखास येतात. गणेशोत्सवासाठी शोभेची फुले, सजावटीच्या वस्तू, पूजेचे साहित्य, मखर, गणपतीचे दागिने, कपडे, खाद्यपदार्थ एकाच ठिकाणी उपलब्ध असल्याने या बाजारपेठांना विशेष महत्त्व आहे. उत्सवाला आठ दिवस शिल्लक असताना या बाजारपेठा गजबजून जातात. परंतु यंदा ग्राहकराजाअभावी बाजारपेठेतील उत्साह मावळला असून अल्प प्रतिसादात खरेदी सुरू आहे.

‘दरवर्षी या दिवसात दुकानापुढे ग्राहकांची गर्दी असते. ग्राहकांची प्रचंड गर्दी होत असल्याने शनिवार-रविवारी अतिरिक्त चार माणसे मदतीसाठी घ्यावी लागतात. गेल्या रविवारी गर्दी झाली, पण नेहमीसारखा प्रतिसाद नव्हता. सध्या तर संध्याकाळच्या वेळेत दोन-चार ग्राहक येतात, तेवढीच काय ती कमाई,’ अशी माहिती सजावटीचे साहित्य विकणाऱ्या लक्ष्मी नागवेकर यांनी दिली.

पूजेचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांचीही हीच अवस्था आहे. सध्या कापूर १२०० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. त्यामुळे कापूर खरेदीत ग्राहकांनी हात आखडता घेतला आहे. ‘दादर बाजारपेठेला रेल्वे स्थानक जवळ असल्याने इथे येणारा बहुतांशी ग्राहक मुंबईतील आहे. दोन लसमात्रा न घेतलेल्यांना लोकल प्रवासास बंदी असल्याने आणि करोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नसल्याने लांबून येणारा ग्राहक यंदा या बाजारपेठांमध्ये फिरकलाच नाही. ६० टक्के ग्राहक आलेलेच नाहीत,’ असे अगरबत्ती व्यावसायिक गोविंदा वैश्य यांनी सांगितले. अशीच अवस्था लालबागमधील बाजारपेठेची आहे.

तांबे आणि पितळ महागले

‘गेल्यावर्षीच्या तुलनेने तांबे आणि पितळाचे दर दुपटीने वाढले आहे. ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलोने मिळणारे पितळ १२०० ते १४०० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद अत्यंत कमी झाला आहे. पूर्वी पितळेचे आरतीचे भांडे आवर्जून खरेदी केले जात होते. परंतु यंदा पितळेचे दर ऐकून ग्राहक अन्य पर्यायांकडे वळत आहेत. ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने बाजारपेठेतआर्थिक संकट घोंघावत आहे,’ असे दादर येथील पी. के. परमार मेटलच्या प्रतिनिधींनी सांगितले.

लाडू, चिवडय़ावरही संक्रांत

लालबागचा लक्ष्मीनारायण चिवडा आणि कडक बुंदीचे लाडू ही लालबाग बाजारपेठेची खासियत. गणेशोत्सवात मुंबईतील अनेक घरांत पाहुणचारासाठी हेच जिन्नस दिले जातात. परंतु यंदा याही बाजारपेठेला घरघर लागली आहे. ‘गेल्यावर्षीच्या तुलनेने मागणी वाढली आहे, पण ही मागणी म्हणजे नफ्याचा व्यवसाय नव्हे. एरव्ही पाच टन चिवडा आणि तितकेच लाडू विकले जायचे. यंदा प्रतिसाद अत्यल्प असून एक टन जिन्नस विकला जाईल का याबाबत शंका आहे. र्निबधांमुळे बाहेरून येणारा ग्राहक यंदा फिरकलाच नसल्याचे ‘विजय लक्ष्मी चिवडा’ दुकानाचे शंकर काळे म्हणाले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-09-2021 at 00:46 IST

संबंधित बातम्या