महिला वाहतूक पोलीस शिपायाचा विनयभंग केल्याप्रकरणी एरिक रॉड्रिक्स वाझ या तरुणाला माटुंगा पोलिसांनी तात्काळ अटक केली होती आणि त्याची न्यायालयाच्या आदेशावरून जामिनावर सुटका करण्यात आली, असा खुलासा पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्या वतीने सहायक आयुक्त आर. आर. जोशी यांनी केला आहे. कारवाई करण्यात आलेली असतानाही त्याची सुटका केली, असे चुकीचे छापले गेले तसेच आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांच्याबद्दलही आवश्यकता नसताना आक्षेपार्ह विधान करण्यात आल्याचे खुलाशात नमूद करण्यात आले आहे.
‘महिला पोलिसाचा विनयभंग करणाऱ्या तरुणाची सुटका’ (२६ डिसेंबर २०१२) या वृत्ताबाबत हा खुलासा करण्यात आला आहे. त्यात म्हटले आहे की, एरिक वाझ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला २३ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली. २५ डिसेंबर रोजी त्याची न्यायालयाने पाच हजार रुपयांच्या जामीनावर सुटका केली. या शिवाय दहा हजार रुपयांचा जामीनदारही त्याला देण्यास सांगण्यात आले होते.  हा आरोपी सध्या जामीनावर आहे. या प्रकरणी तपास सुरू असून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार आहे.