scorecardresearch

‘क्रिप्टो’संबंधी गुंतागुंतीचा उलगडा; आज सायंकाळी ‘लोकसत्ता विश्लेषण’चे आयोजन 

वेबसंवादात सहभागी होणाऱ्या वाचकांना त्यांच्या मनातील प्रश्न व शंका तज्ज्ञ वक्त्यांना विचारता येतील.

आज सायंकाळी ‘लोकसत्ता विश्लेषण’चे आयोजन 

मुंबई : चलनी नोटांना पर्यायी ठरू पाहत असलेली ‘क्रिप्टोकरन्सी’ अर्थात कूटचलनाभोवती एकाच वेळी आकर्षण व उत्सुकता, तर त्याच वेळी भीती, संभ्रमाचे कोंडाळेही आहे. म्हणूनच ‘लोकसत्ता विश्लेषण’च्या आगामी कार्यक्रमात ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या उपयोजनाच्या क्षेत्रात कार्यरत गौरव सोमवंशी हे क्रिप्टो आणि त्याच्याशी निगडित वाद आणि गुंतागुंतीचा उलगडा करणार आहेत.  मंगळवारी, १४ डिसेंबरला संध्याकाळी ६ वाजता दूरचित्रसंवाद माध्यमातून होणाऱ्या ‘लोकसत्ता विश्लेषण’ कार्यक्रमाचे वक्ते गौरव सोमवंशी हे ‘क्रिप्टो’चे अंतरंग खुलवून सांगतील.

या वेबसंवादात सहभागी होणाऱ्या वाचकांना त्यांच्या मनातील प्रश्न व शंका तज्ज्ञ वक्त्यांना विचारता येतील. साधारण एक तपापूर्वी अवतरलेल्या ‘क्रिप्टो’मधील व्यवहार-विनिमय भारतातील अनेकांसाठी तसे नवे नाहीत. तरी अनेकांना केवळ ऑनलाइन आणि संगणकीय संकेतांकाचे रूप असणारे हे चलन म्हणजे नेमके काय? त्याची उत्पत्ती कुठून होते? त्यासाठी वापरात येणारे ब्लॉकचेन तंत्रज्ञान म्हणजे काय? याची पुरेशी जाणीव नाही.

सरकारी पातळीवर आणि रिझर्व्ह बँकेने भीती व्यक्त करूनही भारतात क्रिप्टोचा व्याप वेगाने कसा वाढतो अथवा वाढू शकतो, हेही लोकांना कळू शकलेले नाही. ‘लोकसत्ता विश्लेषण’मधून याच प्रशद्ब्रांची उत्तरे त्यांना मिळविता येतील.

कोणतेही तंत्रज्ञान हे गरजेची उत्पत्ती म्हणून विकसित होत असते. तंत्रज्ञानाच्या उपयोजनाच्या गुण-दोषांवर विचार करीतच पुढची मार्गक्रमणा होत असते. क्रिप्टोचे मूळ असलेल्या ब्लॉकचेन तंत्रज्ञानाला असाच मार्ग खुला करण्याचा धोरणकर्त्यांच्या प्रयत्नांचा अर्थही या निमित्ताने उकलता येईल.

कधी?

मंगळवार, १४ डिसेंबर २०२१, संध्याकाळी ६ वा.

वक्ते : गौरव सोमवंशी

सहभागी कसे व्हाल?

http://tiny.cc/LS_Vishleshan_14Dec या दुव्यावर जाऊन वाचकांनी पूर्वनोंदणी करणे आवश्यक. अथवा सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करूनही नाव नोंदणी करता येईल.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explain the complexities of crypto organizing loksatta analysis akp