मुंबईतील कमाल तापमान  ३७ अंशावर; निर्जलीकरणाच्या तक्रारींमध्ये वाढ

मुंबई : गेल्या आठवडय़ापासून अचानक वाढीस लागलेल्या तापमानाचा पारा चढणीवरच असून मुंबईतील कमाल तापमान ३७ अंश सेल्सियसवर पोहोचले आहे. उन्हाच्या तीव्र झळा जाणवू लागल्याने तसेच आद्र्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे निर्जलीकरणाच्या (डीहायड्रेशन) तक्रारी घेऊन अनेक रुग्ण दाखल होत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. उन्हाचा कडाका असाच कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पुरेशी खबरदारी घेण्याची सूचनाही डॉक्टरांनी केली आहे.

कोरडय़ा हवेमुळे निर्जलीकरणाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. मागील दोन ते तीन दिवसांपासून चक्कर येणे, अतिशय थकवा येणे, घसा सुकणे अशा तक्रारी घेऊन येणाऱ्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. या रुग्णांमध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे निर्जलीकरणाचा त्रास होत असल्याचे आढळले आहे. काही रुग्णांना उलटय़ा आणि जुलाबही होत असल्याचे फॅमिली फिजिशियन डॉ. संजीवनी राजवाडे यांनी सांगितले. निर्जलीकरणाचा त्रास होत असल्याची तक्रार घेऊन येणाऱ्या गर्भवती महिलांचे प्रमाण वाढले आहे. गर्भवती महिलांना सर्वसाधारणपणे पाण्याची जास्त आवश्यकता असते. त्या प्रमाणात पाणी प्यायले जात नसल्यामुळे या महिलांना चक्कर येणे, खूप थकवा जाणवणे असा त्रास होत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. महेश बेडेकर यांनी सांगितले.

मुंबईत सोमवारपासून पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे दोन दिवस तापमानाचा पारा ३९ अंश.से. वर जाण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये निर्जलीकरणाच्या रुग्णांचे प्रमाण काही अंशी वाढण्याची शक्यता असल्याचे मत फॅमिली फिजिशियन डॉ. जयेश लेले यांनी व्यक्त केले.

निर्जलीकरणाचा त्रास का?

 शरीरातील प्रत्येक पेशीला कार्यरत ठेवण्यासाठी, शरीरातील अनावश्यक पदार्थाचे उत्सर्जन करण्यासाठी आणि शरीराचे तापमान नियंत्रित राखण्यासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे.शौच, लघवी, घाम वगरे मार्गानी साधारणत: दिवसाकाठी २ ते ३ लिटर पाणी शरीराबाहेर पडत असते. हवामान आणि कामाच्या स्वरूपानुसार यात बदल होऊ शकतो. प्यायलेल्या पाण्याच्या तुलनेत अधिक पाणी शरीराबाहेर पडत असल्यास शरीरामध्ये पाण्याची मोठय़ा प्रमाणात कमतरता निर्माण होते. या स्थिती अधिक काळ राहिल्यास निर्जलीकरणाचा त्रास होऊ लागतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉक्टरांचा सल्ला

  • नेहमीपेक्षा दीड ते दोन पट अधिक पाणी पिणे.
  • दिवसातून एकदा इलेक्ट्रोलाइट मिसळून पाणी प्यावे.
  • थंड खाण्यापेक्षा नारळ पाणी, ताक यासारखे द्रवरूप पदार्थ प्यावेत.
  • गर्भवती महिला आणि बालके यांनी विशेष काळजी घेत दिवसभरातील जास्तीत जास्त पाणी प्यावे.