मुंबई : शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली असली तरी भाजपाला शिवसेनेसोबत जाण्याची इच्छा असल्याचे वारंवार त्यांच्या नेत्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्ट होत आहे. त्यात पुन्हा हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आगामी २०१९ची लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे संकेत बुधवारी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्याने राजकीय क्षेत्रात चर्चा सुरु झाली आहे.


विधानसभेत बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानाला उत्तर दिले. विखे पाटील यांनी फडणवीस सरकारला उंदीर प्रकरणावरुन टोला लगावत उंदरांनी राज्यातील युती पोखरल्याचे विधान केले होते. याला उत्तर देताना फडणवीस यांनी त्यांच्यावर पलटवार केला. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष म्हणजे सत्तेतील वाघ आणि सिंह आहेत, आगामी निवडणुकीनंतर ते पुन्हा सत्तेत असतील असे सुचक विधान त्यांनी यावेळी केले.

विखे पाटलांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘आपण सभागृहात उंदीर पुराण मोठ्या प्रमाणावर मांडलं. आपण मांडलेले मुषकायन हे अतिशय मनोरंजक आणि कल्पक होतं. यावरुन आपण चांगले लेखक आणि पटकथाकार होऊ शकता असा टोला त्यांनी विखे यांना लगावला. मात्र, उंदीराने पोखरण्याची आम्हाला भिती नाही कारण सध्या सत्तेत वाघ आणि सिंह एकत्रित आहेत. वाघ आणि सिंहांना उंदरांपासून भिती वाटू शकत नाही. आमच्या वाटेत येणाऱ्या उंदरांचा आम्ही निपःत करु आणि २०१९ साली पुन्हा एकत्र येऊन निवडणून येऊन सत्तेत असू, असा विश्वास त्यांनी व्यक्त करीत राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेसाठी पिल्लू सोडून दिले.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानावर याता शिवसेना कसा प्रतिसाद देते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवसेनेची नाराजी दूर होऊन शिवसेना-भाजपाने पुन्हा एकत्र येत आगामी निवडणुका लढवतील आणि पुन्हा सत्तेत येतील, असा विश्वास मात्र भाजपा नेतृत्वाला वाटत आहे.