प्रशांत ननावरे @nprashant

nanawareprashant@gmail.com

काही पदार्थ एका विशिष्ट ब्रॅण्डसोबत जोडले गेलेले असतात. मुंबईत १९६९ साली उदयास आलेला आणि आजही लोकांच्या आवडीचा फास्ट फूड पदार्थ म्हणजे ‘टिब्स’ची फ्रॅन्की. अशा वेळी त्याच पदार्थाची चटक लोकांना लावायची असेल तर तुम्हाला वेगळी शक्कल लढवावी लागते. हे वेगळेपण कधी कधी प्रयोगातून सुचतं तर कधी एखादी विशिष्ट घटना त्याला कारणीभूत ठरते. आज आपण ज्या स्कॉटिश किंवा हिंदुजा फ्रॅन्कीच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या फ्रॅन्कीविषयी जाणून घेणार आहोत त्याची कहाणीदेखील अशीच चटपटीत आहे.

माहीम येथील बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या बाजूच्या गल्लीत १९८५ पासून एक छोटं दुकान आहे. तिथे वडापाव, बिस्किटं, तंबाखू, गुटखा, सिगारेट या गोष्टी मिळत असत. १९९७ साली हरीश चुरी यांनी ती जागा चालवायला घेतली. त्या वेळी आजूबाजूच्या परिसरात फक्त शिवाजी पार्कला फ्रॅन्की मिळायची. म्हणून मित्राच्या सल्ल्याने हरीश यांनी तिथे फ्रॅन्की विकायला सुरुवात केली. सुरुवातीला केवळ व्हेज, चिकन आणि पनीर अशा तीनच प्रकारच्या फ्रॅन्की येथे मिळत. हळूहळू लोकांना फ्रॅन्की आवडायला लागल्यावर हरीश यांनी त्यामध्ये प्रयोग करायला सुरुवात केली.

फ्रॅन्की तयार करताना सुरुवातीला सर्व रोटय़ांवर अंडे टाकले जायचे. पण मग शाळेतील मुलांच्या मागणीनुसार बदल केले गेले. गेल्या एकवीस वर्षांत तीनवरून एकवीस प्रकारच्या फ्रॅन्की येथे मिळायला लागल्या आहेत. त्यात व्हेज, अंडे आणि चिकनचे वेगवेगळे प्रकार आहेत. आलू व्हेज रोल, तवा पनीर, आलू पनीर, चिकन एग, चिकन तिक्का एग व्हेज हे त्यातले मुख्य शिलेदार. त्याशिवाय लोकांच्या आवडीनुसार सेजवान, चीज, अंडेही टाकलं जातं. पण एका वेगळ्या प्रकारची फ्रॅन्की मेन्यूमध्ये दाखल व्हायला पाच-सहा वर्षांपूर्वीची एक घटना कारणीभूत ठरली. शेजारच्याच शाळेतील करिष्मा जैन नावाची मुलगी इथे नेहमी फक्त चीज फ्रॅन्की खात असे. तिने एकदा गंमत म्हणून त्यामध्ये ग्रीन लेज चिप्स टाकायला सांगितले. हळूहळू तिला ते कॉम्बिनेशन आवडू लागलं. तिच्या मित्र-मैत्रिणींनी हा प्रकार पाहिला आणि चाखला. त्यातून मग लेजचे वेगवेगळे फ्लेवर्स ट्राय करायला सुरुवात झाली आणि आता लेज टाकलेली फ्रॅन्की हा इथला लोकप्रिय प्रकार आहे.

फ्रॅन्कीचं बाहेरचं आवरण म्हणून वापरली जाणारी मैद्याची रोटी लाटलेली नसते तर हाताने थापलेली असते. त्यामुळे त्याची चव वेगळी लागते. रोज सकाळी आणि दुपारी अशा दोन बॅचमध्ये बटाटा, पनीरची भाजी आणि चिकन येथे येते. त्यासाठी लागणारा मसाला बाजारातून विकत न आणता दर महिन्याला कुटून घेतला जातो. चिकनच्या ग्रेव्हीचं वेगळेपण म्हणजे त्यात काळं मीठ वापरतात. काळं मीठ पचनासाठी चांगलं असतंच पण त्यामुळे संपूर्ण ग्रेव्हीची चवच बदलून जाते. फ्रॅन्कीला अधिक चमचमीत बनवणारी हिरवी चटणी, तिखट व्हिनेगर आणि तिखटपणा आणणारी लाल मिरचीदेखील रोजच्या रोज तयार केली जाते. एवढंच नव्हे तर चटपटीत चाट मसालाही येथेच बनवला जातो.

शाळेतील मुले, हॉस्पिटलमधील डॉक्टर, एमआर, हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्णांचे नातेवाईक आणि तरुण मंडळी इथे फ्रॅन्की खायला येतात. खाण्याच्या बंधनानुसार रुग्णांसाठीही फ्रॅन्की पार्सल नेली जाते. त्यामुळे मालाचा दर्जा, बनवण्याची पद्धत आणि स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते, असं हरीश सांगतात. शिवाय व्हेज आणि नॉनव्हेज फ्रॅन्कीसाठी तवाही वेगवेगळा आहे. शाळेतली मुले सकाळी जाताना आपली ऑर्डर देऊन जातात. मग शाळा सुटायच्या आधी दहा-पंधरा मिनिटे आधी त्यांची ऑर्डर तयार करून ठेवली जाते. जेणेकरून त्यांना ताबडतोब शाळेची बस पकडता येईल. संध्याकाळच्या वेळेस कॉलेज तरुण-तरुणींची गर्दी होते. त्याचं कारण म्हणजे खिशाला परवडणारी किंमत आणि त्याला साजेसा चटपटीत पदार्थ.

फ्रॅन्कीबरोबरच वांद्रय़ाच्या व्हिनस बेकरीतून येणारे चिकन आणि व्हेज पॅटिसही चवदार आहेत. त्याशिवाय बटाटावडा, समोसा, बिस्किटं, कोल्ड्रिंक्स आणि शेजारीच कटिंग चहासुद्धा मिळतो. गप्पा मारत, खिशाला परवडणाऱ्या चटपटीत फ्रॅन्कींचा आस्वाद घ्यायचा असेल तर ही एक परफेक्ट जागा आहे.

नंदादीप बिस्कीट मार्ट

’ कुठे -९१, सीताकुंड, प्रकाश कोटनीस मार्ग, हिंदुजा हॉस्पिटलच्या समोर, बॉम्बे स्कॉटिश शाळेच्या गल्लीत, माहीम, मुंबई -४०० ०१६

’ कधी – सोमवार ते शनिवार सकाळी ११:३० ते रात्री ८:३० वाजेपर्यंत. रविवार बंद.