माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात दिलेले भरीव योगदान लक्षात घेऊन त्यांच्या जयंती दिनापासून म्हणजेच येत्या १ जुलैपासून ७ जुलैपर्यंत राज्यात कृषी जागृती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील १ कोटी ३५ लाख शेतकऱ्यांचा अपघात विमा उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला असून केंद्राच्या मदतीने ५० टक्के अनुदानावर शेतकऱ्यांना डिझेल पंपाचे वाटपही करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी बुधवारी दिली. त्याचप्रमाणे दुष्काळी भागात रॉकेट लाँचरच्या मदतीने कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
शासनाच्या कृषी विषयक विविध योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा कृषी सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. राज्याने सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना कमालीची यशस्वी ठरली असून या योजनेच्या माध्यमातून मोठय़ाप्रमाणात जलसाठे तयार झाले आहेत, त्यामुळे या पाण्याचा शेतीसाठी उपयोग करण्यासाठी ५० टक्के अनुदानावर डिझेल पंपाचे वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही खडसे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे राज्यातएक कोटी ३५ लाख शेतकरी खातेदार आहेत. सरकारच्या वतीने त्यांचा अपघात विमा काढण्यात येणार असून या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे. या योजनेंतर्गत विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास अथवा कायमचे अपंगत्व आल्यास त्याच्या परिवाराला दोन लाखांची भरपाई मिळेल असेही त्यांनी सांगितले. राज्यात सरासारी चांगला पाऊस पडल्यामुळे पेरण्या झाल्या असल्या तरी अजूनही नांदगाव, सुरगाणा,ईगतपुरी,राधानगरी, गेवराई, शिरूर, उमरगा अशा १४ तालुक्यांमध्ये ५० टक्के पेक्षा कमी पाऊस झालेला आहे. तसेच पुढील काळातही ज्या भागात कमी पाऊस होईल तेथे कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येणार असून त्यासाठी दोन कंपन्यांच्या निविदा आलेल्या आहेत. सप्टेंबर- ऑक्टोबर दरम्यान हा प्रयोग केला जाणार आहे.