काँग्रेसचा सवाल

पंजाबमधील काँग्रेस सरकारने मध्यम व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्जमाफ केले आहे. तर महाराष्ट्रातील भाजप सरकारने एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. पंजाबच्या तुलनेत राज्यातील भाजप सरकार शेतकऱ्यांवर अन्यायच करीत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. ग्रामीण भागात या मुद्दय़ावरच भाजपची कोंडी करण्याची काँग्रेसची योजना आहे.

राज्यात भाजप सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेण्याकरिता अभ्यास सुरू केला आहे. कर्जमाफीची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात आदेश काढलेला नाही. यावरून राज्य सरकारचा अद्याप अभ्यास पूर्ण झालेला नसावा. पंजाब सरकारने दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ करून महाराष्ट्र सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातल्याची टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. पंजाबमधील काँग्रेस सरकारने घेतलेला कर्जमाफीचा निर्णय हा महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशपेक्षा उत्तम असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कर्जमाफीच्या मुद्दय़ावर काँग्रेसने गेली दोन वर्षे आक्रमक भूमिका घेतली होती. कर्जमाफीचे सारे श्रेय भाजप घेण्याचा प्रयत्न करीत असला तरी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशात एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. याउलट पंजाबने दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केल्याने हा मुद्दा राज्याच्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून भाजपची कोंडी करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

कर्जमाफीवरून चर्चेचा घोळ घालण्याचा फार्स सरकारने बंद करावा. यापेक्षा सरकारने कर्जमाफीचा तातडीने आदेश जारी करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.