आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांचा दिंडीत गजर
‘आम्ही तुमच्या साथीला आहोत बाबा, तुम्ही जहर खाऊ नका’.. अशी आर्त विनवणी करत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींनी दुष्काळामुळे कोरडय़ा पडलेल्या ग्रामीण महाराष्ट्राच्या आसवांना या महानगरीत वाट करून दिली.
‘एकवेळ तुम्ही नवीन कपडे, वस्तू खरेदी करून देऊ नका. पण तुम्ही आत्महत्या करण्याचा विचारही मनात आणू नका.. तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा आमच्या रूपात देव पाहा.. सरकार लक्ष देत नसले तरी तुम्ही कष्ट करा, मात्र आत्महत्या करू नका’.. असा संदेश देत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नी व सुमारे पन्नास मुला-मुलींना घेऊन निघालेली नाशिक येथील आधारतीर्थ आधाराश्रमाची दिंडी गेले तेरा दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्य़ांत फिरते आहे. शनिवारी ही दिंडी मुंबईमध्ये पोहोचली. वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयासमोर ज्ञानोबा माऊलीच्या गजर करत पोहोचलेल्या दिंडीचा आधाराश्रमाच्या मुला-मुलींनी सादर केलेल्या नाटिकेने समारोप झाला.
आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षण व पालनपोषणाची जबाबदारी आधारतीर्थ आधाराश्रमाने उचलली असून आश्रमाचे प्रमुख त्र्यंबक गायकवाड यांनी या मुला-मुलींना घेऊन सुरू केलेली दिंडी ११ जानेवारीला सिंदखेडराजा येथून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघाली. विदर्भ, मराठवाडय़ासह महाराष्ट्रातील पंधरा जिल्हे व पंचावन्न तालुक्यांमध्ये फिरून नृत्यनाटिकेच्या माध्यमातून ‘शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका, तुम्ही आत्महत्या केल्यानंतर कुटुंबाची काय अवस्था होते ते पाहा’ असा आर्त संदेश दिंडीमधून देण्यात आला. वसंत स्मृती येथे आमदार आशीष शेलार यांच्याकडे सरकारसाठी मागण्यांचे निवेदन देऊन दिंडीचा समारोप करण्यात आला.
दुष्काळामुळे शेतकरी आत्महत्या करत असून त्यांच्या पश्चात कुटुंबीयांची अवस्था हलाकीची होते. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी, लग्नासाठी समस्या निर्माण होत असून आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांचे शिक्षण थांबवावे लागत असल्याची खंत दिंडीचा समारोप करताना त्र्यंबक गायकवाड यांनी व्यक्त केली. २००७मध्ये सुरू झालेल्या आधाराश्रमात सध्या ३६६ मुले-मुली राहतात. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्थाही आश्रमाकडून करण्यात येते. परंतु अजूनही विविध जिल्ह्य़ांतील सुमारे बाराशे मुले-मुली प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीत असल्याची माहिती त्यांनी दिली. ‘सरकारने शेतकऱ्यांच्या या अवस्थेकडे लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच कुटुंबीयांना आर्थिक साहाय्य करावे. काही तांत्रिक अडचणींमुळे सरकारच्या मदतीपासून ही कुटुंबे वंचित राहतात. यासाठी सरकारकडे केलेल्या मागण्यांविषयी मुख्यमंत्र्यांकडून तीनदा आश्वासन मिळूनही पुढे त्याचे काही झाले नाही,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
‘सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना राबवत आहे. परंतु, वेळ पडल्यास नियमात बदल करून सरकारची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवू,’ असे आश्वासन शेलार यांनी दिले. या वेळी आधारतीर्थ आधाराश्रमाला आर्थिक मदत म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश आशीष शेलार यांनी सुपूर्द केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Farmers son appeal to farmers for not commit suicide
First published on: 26-01-2016 at 07:08 IST