|| जयेश शिरसाट

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वेग मोजणाऱ्या कॅमेऱ्यांच्या टप्प्यातच वाहनांची संथगती; वेगमर्यादेचे नियम अनाठायी असल्याचे वाहनचालकांचे मत :- मुंबईतील वाहतुकीचा वेग वाढवण्याच्या हेतूने शहरात उभारण्यात आलेले उड्डाणपूल आणि उन्नत मार्गावरील अतिवेगामुळे होणारे अपघात रोखण्यासाठी पोलिसांनी लादलेली वेगमर्यादा फार्स ठरत आहे. बहुतांश उन्नत मार्गावर पोलिसांनी किमान मर्यादा ताशी ३० किमी तर कमाल वेगमर्यादा ताशी ६० किमी ठेवली आहे. मात्र, इतक्या कमी वेगाने वाहने हाकणे शक्य नसल्याचे कारण देत वाहनचालकांकडून जास्त वेगाने वाहने दामटली जात आहेत. विशेष म्हणजे, वेगमर्यादा मोजण्यासाठी बसवण्याच्या आलेल्य कॅमेऱ्यांच्या टप्प्यात मात्र, वेगमर्यादेचे पालन होत असल्याने या नियम उल्लंघनावर कारवाई करणेही शक्य होत नाही.

दक्षिण मुंबईत प्रवेश करण्यासाठी अनिवार्य असलेला परंतु, कायम वाहतुक कोंडीत अकडलेल्या मोहम्मद अली मार्गावरील प्रवास सुकर व्हावा यासाठी जेजे उड्डाणपूल बांधण्यात आला. हा पूल वळणावळणांचा असल्याने अतिवेगाचा मोह टाळणाऱ्या दुचाकी आणि अन्य वाहनांचे अनेक अपघात या उड्डाणपुलावर घडले. त्यात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या पुलावरून दुचाकींना बंदी  घालण्यात आली. अपघात घडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी या उड्डाणपुलावर ताशी ३० किलोमिटर प्रति तास अशी वेगमर्यादा लादली. प्रत्यक्षात या मर्यादेला आणि मर्यादा ओलांडल्यानंतर होणाऱ्या कारवाईला वाहनचालक भीक घालत नाहीत. कॅमेऱ्यांचा टप्पा आला की मर्यादेत वेग राहील याची काळजी वाहनचालक घेतात.

हीच गत वांद्रे-वरळी सागरी सेतू आणि पूर्व मुक्त मार्गाची. सेतूच्या मधल्या टप्प्यावर ताशी ८० किलोमीटर तर दोन्ही तोंडांवर ताशी ५० आणि ३० किलोमीटरची मर्यादा आहे. तर मुक्त मार्गावरील मर्यादा ताशी ४० ते ६० किलोमीटर अशी आहे. नव्याने सुरू झालेल्या बीकेसी कनेक्टरवर(चुनाभट्टी-वांद्र-कुर्ला संकुल) ३५ किलोमीटर प्रति तास अशी मर्यादा लादण्यात आली आहे. पण, कोणत्याही परिस्थितीत या मार्गावरील वाहतूक वेगमर्यादा ओलांडूनच धावताना दिसते.

‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने या तिन्ही मार्गावरून वेगमर्यादा पाळून प्रवास केला. परंतु, इतर सर्व वाहने वेगमर्यादा ओलांडत जाताना आढळली. वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या एकूण दंड आकारणीत (ई-चलन) वेगमर्यादा ओलांडणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: सागरी सेतू आणि पूर्व मुक्त मार्गावर वेग ओलांडणाऱ्यांवरील दंड आकारणी तुलनेने जास्त आहे.

जेजे उड्डाणपुलावरील ३० किंवा मुक्त मार्गावरील ६० ही वेगमर्यादा चुकीची आहे, असे टॅक्सी, खासगी कारचालकांचे मत आहे. मर्यादा ओलांडली की हजार रुपयांचा दंड पडतो. मर्यादा पाळून ३०च्या वेगाने टॅक्सी चालवल्यास घाईत असलेले प्रवासी दम देतात, वाद घालतात, अशी व्यथा टॅक्सीचालक मांडतात.

वेगमर्यादा कशी ठरते?

केंद्रीय मोटार वाहन कायद्यात वेगमर्यादा लादण्याची तरतूद आहे. महामार्ग किंवा शहरातील रस्त्याचे स्वरूप, त्यावरील वाहतूक, स्थानिक परिस्थिती आदींचा विचार करून मर्यादा ठरवली जाते. मुंबईत त्यासाठी एक समिती असून त्यात महामार्ग पोलीस, शहर वाहतूक पोलीस, पूल किंवा संबंधित रस्ता उभारणाऱ्या शासकीय यंत्रणेचा प्रतिनिधी सहभाग असतो.

बंधनाचे समर्थन

वेगमर्यादेच्या बंधनाचे वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी समर्थन करतात. जेजे उड्डाण पुलावर मर्यादा लादल्यानंतर एकही अपघात घडलेला नाही. अपघातात मनुष्यहानी होतेच पण वाहतुकीचा खोळंबा होतो. प्रशस्त सागरी सेतूवर मर्यादा लादली नसती तर कार १००, १२५ अशा वेगाने धावल्या असत्या आणि हा वेग अपघातांना कारणीभूत ठरू शकला असता, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

मुंबईतील वाहतुकीचा सरासरी वेग १५ ते २० आहे. त्यामुळे प्रशस्त किंवा मोकळ्या रस्त्यांवरच जास्त वेगाची मर्यादा अपेक्षित आहे. जेथे अपघातांचा इतिहास आहे तेथे वेग मर्यादा असणे जरुरीचे ठरते. – योगेश आंबे, रस्ता सुरक्षातज्ज्ञ.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fars speed limit on important advanced route akp
First published on: 15-11-2019 at 00:35 IST