भायखळ्याच्या राणीबागेत शिरण्यापूर्वी डावीकडल्या ‘भाऊ दाजी लाड संग्रहालया’चं १० रुपयांचं तिकीट काढलंत, तर तिहेरी आनंद मिळण्याची खात्री आहे सध्या! या संग्रहालयातल्या सर्वच्या सर्व जुन्या कलावस्तू आणि मुद्दाम करवून घेतलेले देखावे हे मुंबई शहर आणि ब्रिटिशकालीन मुंबई इलाखा यांच्याबद्दल भरपूर माहिती देणारे आहेत. शिवाय इथंच स्वातंत्र्याच्या सत्तरीनिमित्त दिल्लीहून आलेलं ‘पार्ट नॅरेटिव्ह्ज’ हे प्रदर्शन भरलं आहे. गायत्री सिन्हा यांनी ‘फाळणी, स्थलांतर यांचे स्मरण’ या संकल्पनेभोवती गुंफलेल्या त्या प्रदर्शनाबद्दल आधीही याच स्तंभात कदाचित काहीजणांनी वाचलं असेल. आणखी तिसरं प्रदर्शनही या संग्रहालयाच्या मागच्या भागात १९ ऑगस्ट या ‘जागतिक छायाचित्रकला दिना’पासून सुरू झालंय. हे फोटोंचंच प्रदर्शन असलं तरी या छायाचित्रांचं सादरीकरण निराळं आहे. याच प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, छायाचित्रकारांनी नेहमीच्या कामापेक्षा निराळं काम इथं मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उझ्मा मोहसिन या एरवी ‘स्त्रीवादी छायाचित्रकार’ म्हणून ओळखल्या जातात, पण इथं त्यांनी केलेलं एक वेगळं काम पाहायला मिळेल. सार्वजनिक जागी बॉक्स कॅमेऱ्यानं फोटो काढून, लगेच ‘डेव्हलप’ करून देण्याचा व्यवसाय (जेव्हा चालत होता तेव्हा आणि तोवरच) करणारे भारतभूषण महाजन आणि त्यांचा मुलगा अमित महाजन या दोघांबद्दलचा एक  छोटासा मूकपटच इथं पाहायला मिळतो आणि त्याआधी, चक्रावून टाकणारे भरपूर फोटो! ती सारी छायाचित्रं ‘फोटो काढवून घेण्यासाठी सज्जतेनं बसलेल्या’ अशा माणसांचीच असली, तरी त्यांवर किंवा आसपास अशी काही चिन्हं आहेत की, ते सारे फोटो ‘त्या वेळचे’ असणं शक्यच नाही! खरं आहे. उझ्मा मोहसिन यांनी या महाजन पितापुत्रांकडून काही ‘निगेटिव्ह’ घेतल्या आणि त्यावर पुन्हा काम केलं.. दोन फोटोंच्या एकत्रीकरणातून महाजन पितापुत्र जी ‘ट्रिक फोटोग्राफी’ करीत, त्यासारख्याच काहीशा पद्धतीनं- पण हल्लीच्या प्रतिमा वापरून- याच फोटोंना उझ्मा यांनी नवं रूप दिलं. म्हणजे उदाहरणार्थ, एका मुलीच्या फोटोत तिच्या चेहऱ्यावर जणू पडद्यासारखे मोबाइलच्या कळफलकावरचे ‘इमोजी’ दिसत आहेत.  दुसऱ्या फोटोत, हनुमान छाती फाडून हृदयस्थ श्रीरामदर्शन घडवतो त्या प्रतिमेची आठवण येईल (पण अपमान वगैरे अजिबात होणार नाही) अशा पद्धतीनं एका तरुणाच्या शर्टाची बटणं उघडी आहेत आणि त्यातून आतल्या टीशर्टावर चित्र दिसतंय ते ‘इन्स्टाग्राम’च्या लोगोचं! त्या तरुणाचा फोटो जेव्हा केव्हा काढला गेला असेल, तेव्हा हे इन्स्टाग्राम नावाचं ‘फोटो शेअरिंग अ‍ॅप’ वगैरे काहीच नव्हतं.. मोबाइलही नव्हते. मग आत्ता इथं ते कसं काय? शिवाय दर दहाबारा फोटोंनंतर एक बदामाचे ठसे ठेवलेत आणि ते फोटोभोवतीच्या पांढऱ्या कागदावर मारण्याची मुभा लोकांना आहे, हे पाहिल्यावर लक्षात येतं : उझ्मा यांनी महाजन पितापुत्रांच्या फोटोंना हल्लीच्या ‘इन्स्टाग्राम संस्कृती’ची जोड दिली आहे. ते ठसे म्हणजे इन्टाग्रामवरले ‘लाइक’!

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fascinating dr bhau daji lad museum
First published on: 31-08-2017 at 04:45 IST