मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा मिळण्याचे येथील रेल्वे प्रवाशांनी पाहिलेले ‘दिवा’स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. येत्या रविवारपासून (१८ डिसेंबर) दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा द्यावा, या मागणीसाठी रेल्वे प्रवाशांनी आंदोलने केली. येथील प्रवाशांनी मागणी लक्षात घेऊन दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यासाठी फलाटांची आणि अन्य कामे करण्याचे काम हाती घेण्यात आली. विशेष ब्लॉक घेऊन ही कामे पूर्ण करण्यात आली आहेत. ऑक्टोबरमध्ये शेवटचा ब्लॉक घेऊन काम पूर्ण केल्यानंतर दिवा स्थानकात जलद लोकल फेऱ्यांना थांबा मिळेल, अशी आशा होती. मात्र सिग्नल यंत्रणा आणि काही तांत्रिक कामे शिल्लक असल्याने दिवाळीत दिवा स्थानकात जलद लोकलला थांबा देण्याचा मुहूर्त टळला आणि पुन्हा एकदा येथील प्रवाशांची निराशा झाली. ही कामे पूर्ण करून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात थांबा देण्याचे नियोजन होते; पण तोही मुहूर्त हुकला. मध्य रेल्वेने तर त्यासाठी वेळापत्रकही तयार केले आहे. या वेळापत्रकानुसार सीएसटीकडून आणि सीएसटीहून सुटणाऱ्या जलद लोकलच्या २४ फेऱ्यांचे नियोजन केल्याचे सांगण्यात येत होते. जलद लोकलला थांबा देण्याचा मुहूर्त अनेकदा टळला असल्याने प्रवाशांच्या पदरी आलेली निराशा आता दूर होणार आहे. रविवारपासून (१८ डिसेंबर) जलद लोकल थांबणार आहेत. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार असल्याचे सांगितले जात आहे. याचबरोबर राम मंदिर स्थानक, पश्चिम रेल्वेवर दादर स्थानकात नव्याने तयार झालेल्या फलाट क्रमांक सात आदींसह अनेक प्रकल्पांचे रेल्वेमंत्री प्रभू यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचे सांगण्यात येते.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast locals halt at diva station from 18 december
First published on: 16-12-2016 at 16:51 IST