रविवारी कोल्हापूरसह पुणे व मुंबई येथे मतदान; १२१ उमेदवार रिंगणात
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पंचवार्षिक निवडणूक येत्या २४ एप्रिल रोजी होत असून या वेळच्या निवडणुकीत नऊ पॅनेल्स निवडणूक आखाडय़ात उतरली आहेत. चित्रपटाशी संबंधित विविध १४ विभागांसाठी एकूण १२१ उमेदवार निवडणूक िरगणात आहेत. कोल्हापूरसह पुणे व मुंबई येथे मतदान होणार असून २६ एप्रिल रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
महामंडळाच्या विद्यमान अध्यक्षांसह दोन माजी अध्यक्षांची पॅनेल्स स्वतंत्रपणे निवडणूक लढवीत असून निवडणुकीसाठी एकूण ३ हजार ८०० मतदार आहेत. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत या वेळी कधी नव्हे ती चुरस निर्माण झाली आहे.
महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष विजय पाटकर (क्रियाशील पॅनेल), माजी अध्यक्ष विजय कोंडके (विजय कोंडके पॅनेल), माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे (शक्ती पॅनेल) प्रसाद लाड (संघर्ष), मेघराज भोसले (पतंग), मोहन पिपळे (दादासाहेब फाळके), दीपक कदम (परिवर्तन), विजय सावंत (माय मराठी), रणजित मिणचेकर (राजर्षी शाहू सिने) यांचा समावेश आहे. ज्येष्ठ अभिनेते-निर्माते व दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्यासह अन्य १२ जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवीत आहेत. चित्रपटाशी संबंधित १४ विभागांसाठी ही निवडणूक होणार असून यात निर्माता, रंगभूषा, वितरण, अभिनेत्री, प्रसिद्धी, छायाचित्रण, संकलन, निर्मितीव्यवस्था, दिग्दर्शक, अभिनेता, लेखक, नृत्य दिग्दर्शक, कामगार, ध्वनिलेखन या विभागांचा समावेश आहे. या वेळी राजकीय पक्षाशी संबंधित मंडळींनी आपले पॅनेल उभे केले असून राजकीय पक्षांचा पाठिंबा त्यांनी मिळविला आहे. गुरुवारी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ‘शक्ती पॅनेल’चे प्रसाद सुर्वे यांनी कलाकारांसाठी ‘सी लिंक प्रॉपर्टी’च्या सहकार्याने ‘घरकुल योजना’ राबविणार आहोत. योजनेत कलाकारांना कर्ज आणि घर दोन्ही मिळू शकेल, असे सांगितले. तर शक्ती पॅनेलचे उमेदवार संजय पाटील, दिलीप दळवी, अर्चना नेवरेकर यांनी सुर्वे यांनी या अगोदर काय काय काम केले त्याची माहिती दिली.
भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रचारात
चित्रपट महामंडळाचा राज्य शासनाकडून आर्थिक अनुदान मिळावे, अशी मागणीही या वेळी केली. तर ‘संघर्ष पॅनेल’ने आपल्या जाहीरनाम्यात महामंडळात झालेल्या भ्रष्टाचाराची वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी केली जाईल, संचालकांनी सभासदांकडून लुबाडलेला पैसा संचालकांकडून व्याजासहित वसूल केला जाईल, दोषी संचालकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, अशी आश्वासने दिली आहेत. २४ एप्रिल रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार असून मुंबईतील मतदान प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे महामंडळाच्या कार्यालयात होणार आहे.