तीन दिवसांचे ‘चित्रपट संमेलन’
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त पुढील वर्षी जानेवारी महिन्यात पुण्यात तीन दिवसांचे पहिले ‘चित्रपट संमेलन’ आयोजित करण्यात येणार आहे. तसेच लवकरच महामंडळाचा संपूर्ण कारभार ‘डिजिटल’ करणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी बुधवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.
महामंडळाच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठक बुधवारी प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे कला अकादमी येथे महामंडळाच्या कार्यालयात झाली. त्या बैठकीनंतर भावी योजनांची माहिती भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महामंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारचे ‘चित्रपट संमेलन’ भरविण्यात येणार असून तीन दिवसांच्या संमेलनात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामवंत निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार असल्याचे सांगून भोसले म्हणाले, मराठी चित्रपट सृष्टीसाठी ‘प्रभात फिल्म कंपनी’चे महत्त्वपूर्ण योगदान आहे. आम्ही दर वर्षी पुण्यात १ जून रोजी ‘प्रभात दिन’ साजरा करतो. त्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. येत्या १ जूनपासून हा प्रभात दिन संपूर्ण राज्यभरात साजरा केला जाणार आहे.
महामंडळाचा संपूर्ण कारभार ‘डिजिटल’ केला जाणार असून लवकरच महामंडळाचे संकेतस्थळ सुरू केले जाईल. महामंडळाचा कारभार ऑनलाइन होईल. आगामी चित्रपटांच्या प्रसिद्धीसाठी ‘युथ चॅनेल’ सुरू करण्याचाही विचार आहे. चित्रपट महामंडळाकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत.