साजन, प्रहार आदी गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे निर्माते सुधाकर बोकाडे (५७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी रात्री मुंबईतील एका रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात दिव्या आणि किरण या दोन मुली व मुलगा कृष्णा असा परिवार आहे.
बोकाडे काही कामानिमित्त मुलगा कृष्णासोबत मलेशियाला गेले होते. परतीच्या प्रवासात त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. म्हणून त्यांना तातडीने अंधेरीतील कोकीळाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. अखेर रविवारी रात्री त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्यावर ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. बोकाडे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र या वेळी उपस्थित होते.
माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि सलमान खान यांच्या गाजलेल्या ‘साजन’ या चित्रपटाची निर्मिती बोकोडे यांची होती. त्याचबरोबर नाना पाटेकर यांचा गाजलेला ‘प्रहार’, सैफ अली खानचा ‘सनम तेरी कसम’, अजय देवगण यांचा ‘धनवान’ आदी चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती.