मुंबई : वादग्रस्त विधानांवरून कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना यापूर्वी दोनदा ताकीद दिली होती. आता तिसऱ्यांदा ही वेळ आली आहे. पुढील आठवड्यात त्यांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांची बाजू समजून घेणार आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून कोकाटे प्रकरणी निर्णय घेतला जाईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी स्पष्ट केले. अजितदादांच्या या भूमिकेने कोकाटे यांच्यावर टांगती तलवार कायम आहे.
विधान परिषद सभागृहात रमी खेळत असल्याची चित्रफीत उघड झाली. त्यानंतर सरकारला भिकाऱ्याची उपमा दिली. या दोन्ही बाबी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गांभीर्याने घेतल्या आहेत. यातूनच कोकाटे यांची गच्छंती अटळ मानली जाते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही कोकाटे यांच्या वर्तनावर तीव्र नापसंती व्यक्त केली. कोकाटे यांनी यापूर्वी वादग्रस्त विधाने केली तेव्हा त्यांना ईजा, बिजा ताकीद दिली होती. पदावर असताना जबाबदारीने वागण्याचा सल्ला पक्षाच्या बैठकीत सर्व मंत्र्यांना दिला होता. कोकाटे यांनी ईजा, बिजा आता तिजा ताकीद देण्याची वेळ आली आहे, असे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सभापती, अध्यक्षांकडून चौकशी
रमी खेळत असल्याची चित्रफीत ही विधान परिषद सभागृहातील असल्याने यावर सभापती आणि अध्यक्षांकडून सध्या चौकशी सुरू आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर सर्व मंत्र्यांना कामकाजाबाबत आम्ही स्पष्ट सूचना दिल्या होत्या. कोकाटे यांचा राजीनामा घेणार का, या प्रश्नावर त्यांची बाजू समजून घेतल्यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे पवारांनी सांगितले.
टांगती तलवार
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली नापसंती, अजित पवारांची आजची भूमिका यातून कोकाटे यांना एकतर राजीनामा देण्यास भाग पाडले जाईल किंवा त्यांच्याकडील कृषी हे खाते काढून घेतले जाईल, अशी शक्यता राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त केली जाते.