सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांच्या नव्वदीपार टक्केवारीमुळे अकरावी प्रवेशाची कटऑफ वधारणार हा समज सोमवारी सायंकाळी जाहीर झालेल्या पहिल्या गुणवत्ता यादीने फोल ठरविला. काही ठरावीक महाविद्यालयांमध्ये कला शाखेची वाढलेली मागणी वगळता अकरावीच्या मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) महाविद्यालयांची पहिली कटऑफ गेल्या वर्षीच्या तुलनेत फारशी वाढली नाही.

अकरावीच्या २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांच्या ऑनलाइन प्रवेशाकरिता उपसंचालक विभागाने सायंकाळी ५ वाजता पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली. यात अर्ज केलेल्या २,२२,६२२ विद्यार्थ्यांपैकी १,८४,९७७ विद्यार्थ्यांना पहिल्या प्रवेश फेरीत प्रवेश मिळाला आहे. एकूण ४७,६४८ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला आहे. तर २२,३४८ विद्यार्थ्यांना दुसऱ्या तर १६,०७७ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीच्या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळाला आहे. तर कुठल्याच पसंतीच्या जागेला प्रवेश न मिळाल्याने अद्याप ३७,६४५ विद्यार्थी प्रवेशाविना आहेत. ऑनलाइन प्रवेशाआधी संस्थास्तरावरील इनहाऊस, मॅनेजमेंट, अल्पसंख्याक जागांवरील प्रवेश करण्यात आले होते. त्यांच्याही एकूण ४३ हजार रिक्त जागा पहिल्या फेरीकरिता उपलब्ध झाल्या होत्या.

यंदाच्या कटऑफमध्ये फार वाढ होईल, अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत एखाद टक्काच कटऑफ वधारला आहे, असे डहाणूकर महाविद्यालयाच्या प्राचार्य माधवी पेठे यांनी सांगितले. प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी http://fyjc.org.in/mumbai  या संकेतस्थळावर जाऊन प्रवेश अर्ज क्रमांक, लॉग-इन आयडी टाकून त्याची प्रिंट घ्यायची आहे. त्यानंतर प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयात मूळ कागदपत्रांसह प्रत्यक्ष जाऊन २८ ते ३० जून दरम्यान ५० रुपये शुल्क भरून प्रवेश निश्चित करायचा आहे. विद्यार्थ्यांनी शुल्क भरून प्रवेश निश्चित न केल्यास तो अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर जाईल.
chart

‘यशदा’कडून तपासणी

संस्थास्तरावर इनहाऊस, मॅनेजमेंट, अल्पसंख्याक कोटय़ाअंतर्गत होणाऱ्या प्रवेशांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी या सर्व प्रवेशांची ‘यशदा’ या यंत्रणेमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. हे प्रवेशही गुणवत्तेनुसार होणे अपेक्षित आहेत. मात्र, गुणवत्तेचे निकष गुंडाळून काही संस्था मनमानीपणे प्रवेश करतात. त्यांना यामुळे आळा बसणार आहे, असे उपशिक्षण संचालक बी. बी. चव्हाण यांनी सांगितले.