मुंबई : दहिसर ते डी. एन.नगर मेट्रो २ अ  मार्गिकेतील डहाणूकरवाडी ते आरे आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व मेट्रो ७  मार्गिकेतील दहिसर ते आरे टप्प्याला मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीएमआरएस) सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.  येत्या दहा दिवसांत पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होणार असून उद्घाटनाच्या तयारीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) लागले आहे. उद्घाटनाचा मुहूर्त सोमवारी वा मंगळवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. हा टप्पा सेवेत दाखल झाल्यास पश्चिम उपनगरातील प्रवास वेगवान आणि सुकर होईल. 

३३६ किमीचा मेट्रो प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. एकूण १४ मेट्रो मार्गिकेची उभारणी या प्रकल्पांतर्गत केली जात आहे. ३३६ किमीपैकी ११.४० किलोमीटरची मार्गिका ८ जून २०१४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाली असून या मार्गिकेला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता आठ वर्षांनंतर मुंबईकरांना आणखी दोन मेट्रो मार्गिकेतून प्रवास करता येणार आहे. पुढील दहा दिवसांत मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो २अ आणि ७ चा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल होईल. पहिला टप्पा सुरू करण्यासाठी एमएमआरडीएला सुरक्षा प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.  यासाठीची तयारी सुरू असून उद्घाटनाची नेमकी तारीख निश्चित करण्याचे काम सुरू आहे. येत्या दोन, तीन दिवसांत तारखेचा अंतिम निर्णय होईल अशी माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी लोकसत्ताह्ण ला दिली.

सव्वा महिन्यांपासून सीएमआरएसच्या पथकाकडून सुरक्षा चाचणी सुरू होती. ही चाचणी यशस्वी झाल्याने सीएमआरएसने पहिल्या टप्प्यासाठी सुरक्षा प्रमाणपत्र दिले आहे. हे प्रमाणपत्र देताना सुरुवातीच्या तीन ते चार महिन्यांसाठी ताशी ८० किमी वेगाऐवजी ताशी ७० किमी वेगाने मेट्रो चालविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे सुरुवातीला काही महिने ताशी ७० किमी वेगाने मेट्रो धावेल असेही श्रीनिवास यांनी सांगितले.

सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत मेट्रो सेवा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहिला टप्प्याच्या वेळापत्रकानुसार सकाळी ५ ते रात्री ११.३० या वेळेत मेट्रो धावणार आहे. डहाणूकरवाडी मेट्रो स्थानकातून सकाळी ५ वाजून ७ मिनिटांनी पहिली गाडी सुटणार असून रात्री ११ वाजून २२ मिनिटांनी आरे मेट्रो स्थानकातून शेवटची गाडी सुटेल. सुरुवातीचे काही दिवस मेट्रो सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत धावणार असल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी ११ गाडय़ा तयार असून लवकरच मुंबईकर नव्या मेट्रोतून प्रवास करू शकतील असेही त्यांनी सांगितले.