मुंबई: बेस्ट प्रवासाचा सात दिवसांचा पास अवघ्या एक रुपयांत मिळणार असून चलो ॲपचा पहिल्यांदा वापर करणाऱ्या नव्या प्रवाशांना ही सुविधा घेता येणार आहे. या सात दिवसांत वातानुकूलित किंवा विना वातानुकूलित बसमध्ये सात दिवसांत कितीही अंतराच्या पाच फेऱ्यांचा लाभ घेता येईल. ही सवलत येत्या १५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि बेस्ट महापालिकेच्या आखत्यारित आल्यास झालेली ७५ वर्षे याचे औचित्य अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून बेस्ट उपक्रमाने बेस्ट आझादी योजना जाहिर केली आहे. या योजनेंतर्गंत सात दिवसांचा बसपास केवळ एक रुपयांत डाऊनलोड करता येणार आहे. काही महिन्यांपूर्वीच बेस्ट उपक्रमामध्ये डिजिटल तिकीट प्रणाली सुरू केली. त्याअंतर्गत प्रवाशांना तिकीट आणि बसपास खरेदी करीता मोबाईल तिकीट ॲप आणि बेस्ट चलो एनसीएमसी कार्डचा प्रारंभ करण्यात आला होता. सध्या ३३ लाख प्रवाशांपैकी २२ लाख प्रवासी चलो ॲपचा वापर करतात. साडेतीन लाख प्रवासी डिजीटल तिकीट प्रणाली वापरतात. या सेवांना चालना देण्याच्या उद्देशाने बेस्ट आझादी बसपास योजना घोषित करण्यात आली आहे.