किमती वधारल्याने सर्वसामान्यांना परवडेना; झेंडू २००, सायली ५०० तर मोगरा १००० रुपये किलो

परतीच्या पावसाचा फटका फुलांच्या उत्पादनाला बसल्याने ऐन दिवाळीत फुलांचे भाव गगनाला भिडले आहेत. दिवाळीत झेंडूंच्या फुलांना विशेष भाव असतो. परंतु, झेंडूबरोबरच नानाविध फुलांच्या किमती वधारल्याने सर्वसामान्यांकरिता ती परवडेनाशी झाली आहेत. दादरच्या फुलबाजारात मंगळवारी सकाळी झेंडू २०० रुपये किलोने विकला जात होता, तर मोगरा-सायलीसारखी सुवासिक फुले किलोला ५०० ते १२०० रुपये असा भाव खात होती. याशिवाय पूजेकरिता लागणाऱ्या फुलांच्या आणि पत्रींच्या किमतीतही वाढ झाली आहे.

झेंडूच्या माळा, पूजेसाठी लागणारी तुळशी, दूर्वा, लाल फुले, बेलपत्र, केळ्याचे खांब याशिवाय गजरा आणि वेणीसाठी लागणारा मोगरा, सायली, शेवंती यांसारख्या फुलांनी दादरचा फुलबाजार मागील दोन दिवस बहरला आहे, तसेच तोरणांसाठी लागणारे भाताचे कोंब आणि रानटी फुले विकण्यासाठी वसईहून आदिवासी स्त्रिया दादर बाजारात दाखल झाल्या आहेत. मात्र पावसाने लांबवलेल्या प्रवासाचा फटका फुलांच्या उत्पादनावर झाल्याने मंगळवारी फुलांच्या दरात वाढ झाल्याचे चित्र बाजारात दिसत होते. त्यामुळे गुरुवारी लक्ष्मीपूजनाकरिता सर्वसामान्यांना वाढीव दराने फुलांची खरेदी करावी लागणार आहे.

बाजारात चांगली मागणी असलेल्या कोलकाता झेंडू २०० रुपये किलोने विकला जात आहे. आकाराने लहान असलेल्या हा झेंडू चार ते पाच दिवस टिक तो. त्यामुळे त्याचा वापर तोरणांसाठी केला जातो. याशिवाय अष्टगंधा व नामधारी झेंडू हा १५० रुपये किलो तर लवकर कोमेजणारा इंडिका झेंडूची १०० रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. पूजेसाठी लागणारी तुळशीची जुडी २० रुपये, दुर्वा ३० रुपये, लाल फुले २० रुपये किलोने तर छोटे केळीचे खांब ८० रुपयांना विकले जात आहेत.

गजऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मोगरा, सायली, जुईच्या फुलांचा दरवळही महागला आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास मोगरा १००० रुपये किलोने तर संध्याकाळी ६०० रुपये किलोने विकला गेल्याचे फुल विक्रेते मोहन जानबरे यांनी सांगितले.

याशिवाय जुई १२०० ते १००० रुपये किलो व सायली ५०० रुपये किलो दराने विकल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या आठवडय़ात पडलेंल्या पावसाचा फटका फुलांच्या उत्पादनावर पडल्याने बाजारात माल कमी दाखल झाला आहे. त्यामुळे फुलांच्या किमती वाढल्या आहेत, असे फुलविक्रेते बबनराव पाचपुते यांनी सांगितले.

दिवाळीचे पुढचे दोन दिवस तरी फुलांचे दर वधारलेलेच राहतील, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

सायंकाळी गंध हरवतो तसा सकाळच्या वेळेस फुलांचे दर सर्वाधिक असतात. सकाळी टवटवीत असलेली फुले सायंकाळी काहीशी कोमजू लागतात. त्याचा परिणाम फुलांच्या किमतींवरही होतो. त्यामुळे सकाळच्या तुलनेत सायंकाळी फुले काहीशी स्वस्त झालेली असतात, असे दादरमधील फुलांचे व्यापारी मोहन जानबरे यांनी या वेळी सांगितले.

फुलांचे दर (किलोमागे)

फुल                  इतर दिवशी                       मंगळवारचे दर

झेंडू                  ६० ते ८० रुपये                      २०० रुपये

मोगरा            ३०० ते ४०० रुपये                  ६०० ते १००० रुपये

शेवंती             ५० ते ६० रुपये                     १५० रुपये

सायली                २०० रुपये                       ५०० रुपये

चाफा      १० रुपयांना ५ फुले                   २० रुपयांना ८ फुले