लाळ्या-खुरकत रोगाची वेगाने लागण, शेतकरी हतबल

नापिकी, दुष्काळ, गारपीट तसेच कर्जबाजारीपणामुळे आधीच त्रस्त असलेला शेतकरी पूरक उद्योग म्हणून दुग्ध उत्पादनाकडे वळत असताना गाई-म्हशींसाठी अत्यावश्यक असलेल्या लाळ्या खुरकत रोगावरील लसीची खरेदी करण्यात काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी घोळ घातल्याचा मोठा फटका कोल्हापूरसह अनेक जिल्ह्यात गाई-म्हशींना बसू लागला आहे. आतापर्यंत सहा वेळा लशीच्या खरेदीसाठी निविदा काढूनही अंतिम करण्यात अपयश आल्यामुळे आता सातव्यांना निविदा काढण्याची वेळ पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागावर आली आहे.

राज्यातील सुमारे दोन कोटी गाई-म्हशी व शेळ्या मेंढय़ांना लाळ खुरकत आजारावर दर सहा महिन्यांनी एफएमडी (फूड अँड माऊथ डिसीझ) लस दिली जाते. या लशीची निर्मिती करणाऱ्या देशात तीनच कंपन्या असून हा साथीचा आजार वेगाने पसरणारा आहे. या आजारात जनावरांच्या तोंडात फोड येणे व खुरांमध्ये फोड येऊन त्याचा अन्नसेवन व चलवलनावर परिणाम होत असतो. २०१७ मध्ये या लशीच्या खरेदीसाठी तब्बल चारवेळा निविदा काढण्यात आल्या. चौथ्यांदा काढलेल्या निविदेत इंडियन इम्युनॉलॉजी प्रथम पात्र ठरल्यानंतर त्यांना काम देण्याचे निश्चित करण्यात आले मात्र त्यांनी अन्य राज्यात महाराष्ट्रापेक्षा कमी किमतीला निविदा भरल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पाचव्यांना निविदा काढण्यात आली. या निविदेत बायोव्हिटा कंपनी प्रथम आल्यानंतर विधिमंडळात काही आक्षेप घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि  उच्च स्तरीय समितीची परवानगी घेतली नसल्याचे कारण देत अधिऱ्यांनी फेरनिविदा काढण्याचा अट्टाहास धरला.

पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी जनावरांच्या आजाराची गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन तातडीची बाब म्हणून लस खरेदीचे आदेश देऊनही अधिकाऱ्यांनी त्याचे पालन केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यानंतर सहाव्यांदा निविदा काढण्यात आल्या त्यावेळी तीन कंपन्यांपैकी दोन कंपन्यांनी अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून निविदेत भागच घेतला नाही.

या साऱ्यात गेले सहा महिने राज्यातील दोन कोटी जनावरांना लस देण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या असून स्थानिक पातळीवर खरेदीचे आदेश काढण्याची वेळ विभागावर आली. त्यानंतर आता सातव्यांदा एफएमडी लशीच्या खरेदीसाठी निविदा काढण्यात आली असून येत्या २१ फेब्रुवारीरोजी त्यावर निर्णय घेतला जाणार असून अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे संबधित लस पुरवणाऱ्या कंपन्या यावेळी सहभागी होतील की नाही याबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान कोल्हापूरमध्ये मोठय़ा प्रमाणात गाई-म्हशींना लाळ खुरकत रोगाची लागण होण्यास सुरुवात झाली असून मंत्री महादेव जानकर यांनी कोल्हापूरसह संबंधित जिल्ह्यंना भेटी देऊन स्थानिक पातळीवर लस खरेदीचे आदेश दिले आहेत.

यावेळी लस खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. संबंधित कंपन्या निविदेत सहभागी न झाल्यास केंद्र शासनाच्या अखत्यारितील नियमांच्या आधारे लशीची खरेदी करण्यात येईल. तसेच ज्या अधिकाऱ्यांमुळे दिरंगाई झाली त्याबाबतही चौकशी केली जाईल.   – महादेव जानकर, पशुसंवर्धनमंत्री