प्रत्येक वेळी लाखो रुपयांचा माल जप्त करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी परेल येथील फिनिक्स मॉलमधील मोठय़ा फुडहॉलमध्ये केवळ १२९० रुपये किमतीचे मुदतबाह्य़ खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. त्यामुळे या जप्तीबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरक्षित मुंबई असोसिएशनचे दिनेश वाघेला परेल येथील फिनिक्स मॉलमधील फुडमॉलमध्ये खरेदीसाठी गेले असता ३५ ग्रॅम चहाच्या पाकिटावर ७०० रुपये किंमत दिसली. त्यामुळे उत्सुकतेपोटी त्यांनी पाकिटावरचे तपशील वाचल्यावर पाकीट सहा महिन्यांपूर्वीच मुदतबाह्य़ झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पेप्सी, ट्रॉपिकाना कंपनीचे ज्यूस, चिप्स आदी वस्तू मुदतबाह्य़ असल्याचे आढळून आले.

संबंधित कर्मचाऱ्यांनादेखील याची कल्पना दिली असता, हा माल काढण्याच्या सूचना अद्याप आलेल्या नाहीत, असे सांगण्यात आले. ५ जूनच्या या भेटीनंतर २२ जून रोजीदेखील पुन्हा फुडमॉलमध्ये गेलो असताना काही खाद्यपदार्थ मुदतबाह्य़ असल्याचे आढळले. म्हणून मग याची तक्रार अन्न व औषध प्रशासनाकडे २५ जून रोजी दाखल केल्याचे दिनेश वाघेला यांनी सांगितले.

फिनिक्स मॉलमधील फुडमॉल हा खूप मोठा असून त्यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ विक्रीस आहेत. त्यातील १४०० रुपयांचा माल तर आम्हीच खरेदी केला होता. मात्र अन्न व औषध प्रशासनाला पूर्ण फुडमॉल तपासणीमध्ये केवळ १२९० रुपयांचा माल मुदतबाह्य़ मिळणे हे आश्चर्यकारक आहे, असे दिनेश वाघेला यांनी सांगितले.

फुडमॉलमध्ये सुरुवातीला आम्ही ग्राहक म्हणून तपासणी केली असता विक्रीस ठेवलेला माल वेगळा काढला. त्यानंतर फुडमॉलच्या संबंधित अधिकाऱ्यांना ही बाब लक्षात आणून देऊन त्यांच्या गोदामाची तपासणीदेखील केली; परंतु संपूर्ण फुडमॉलमध्ये थोडय़ाच वस्तू मुदतबाह्य़ असल्याचे आढळले, असे या कारवाईमध्ये सहभागी असलेले अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे म्हणाले.

फुडमॉलमधून खाद्यपदार्थ घेताना सावधान

आपल्याकडे मॉलमधून वस्तू विकत घेताना (विशेषत: खाण्याच्या वस्तू) त्यावरचे तपशील वाचण्याची सवय ग्राहकांना नाही. त्यामुळे स्वस्त आणि सूट असलेल्या खाद्यपदार्थाकडे आकृष्ट होऊन ग्राहक सर्रास पदार्थ विकत घेतात; परंतु यामध्ये मुदतबाह्य़ किंवा खराब पदार्थ असण्याची शक्यता असते. तेव्हा ग्राहकांनी चकचकीत अशा फुडमॉलमधून खाद्यपदार्थ खरेदी करताना सावधगिरी बाळगा, असे आवाहन सुरक्षित मुंबई असोसिएशनचे दिनेश वाघेला यांनी केले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Food mall food adulteration
First published on: 22-07-2018 at 01:27 IST