मुंबई : रुग्णालयातून मृतदेह योग्य पद्धतीने घरी नेता यावा, कर्मचारी व नातेवाईकांना संसर्ग होऊ नये या दृष्टीकोनातून जे.जे. रुग्णालयामधील मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी अद्ययावत व अत्याधुनिक अशा दोन इलेक्ट्रिक शववाहिन्या उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या शववाहिन्यांचे उद्घाटन जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मृतदेह शववाहिनीत चढविताना किंवा उतरवितान त्याला काही होणार नाही याची काळजी नातेवाईक व शववाहिनीतील कर्मचाऱ्यांना घ्यावी लागते. काही वेळा स्ट्रेचरवरून मृतदेह पडण्याची शक्यता असते. त्यामुळे जे.जे. रुग्णालयाने मृतदेहांची वाहतूक करण्यासाठी खास दोन शववाहिन्या तयार केल्या आहेत. यामध्ये सुरक्षा, कार्यक्षमता आणि सन्मान यांचा समतोल राखणाऱ्या नाविन्यपूर्ण वैशिष्ट्यांचा समावेश आहे. यात आधुनिक हायड्रॉलिक प्रणाली व टिल्टिंग रोलर यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे मृतदेह स्ट्रेचरवरून हलवणे अधिक सोपे होते आणि त्यासाठी कमी मनुष्यबळाची आवश्यकता भासते. त्यामुळे मृतदेहाची काळजीपूर्वक हाताळणी होण्याबरोबरच कुटुंबीय किंवा रुग्णालय कर्मचाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये अशा प्रकारची सेवा सुरू करणारे जे. जे. रुग्णालय हे पहिले शासकीय रुग्णालय ठरल्याचे डॉ. अजय भंडारवार यांनी सांगितले.

या वाहनांच्या उद्घाटनप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. बी. जी. चिखलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

ईव्ही ही वाहने पूर्णतः पर्यावरण पूरक असून, त्यांचे कार्बन उत्सर्जन शून्य आहे. राज्य सरकारच्या हरित व शाश्वत आरोग्य सेवांच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. यामुळे रुग्णालयाचा कार्बन फुटप्रिंट कमी होईल. जे. जे. रुग्णालय तंत्रज्ञानाच्या दृष्टीने पुढे आहेच, पण त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रात पर्यावरण पूरक सेवा देण्यामध्ये अग्रेसर असल्याचे डॉ. भंडारवार यांनी सांगितले.

शववाहिनीमध्ये संक्रमण रोखणारी यंत्रणा

जे. जे. रुग्णालयामध्ये आणण्यात आलेल्या या नव्या शववाहिन्यांमध्ये निगेटिव्ह प्रेशर प्रणाली ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे संक्रमण रोखण्यास मदत होऊन संसर्ग पसरण्याचा धोका टाळता येणार आहे. यामुळे कर्मचारी, नातेवाईक व परिसर सुरक्षित राहण्यास मदत होऊन मृतदेह वाहतूक प्रक्रियेतील गुणवत्ता वाढते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मृत व्यक्तीचे पार्थिव योग्य पद्धतीने घेऊन जाता यावे आणि कुटुंबाला कमीत कमी त्रास व्हावा यादृष्टीने ही वाहने तयार करण्यात आली आहेत. ही वाहने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असल्यामुळे त्यासाठी कमी मनुष्यबळ लागते. आपत्कालीन सेवा अधिक कार्यक्षम होते आणि व्यवस्थापनात सुधारणा होते. ही सेवा सार्वजनिक आरोग्य सेवेमध्ये एक नवा आदर्श निर्माण करणारी पायाभूत सुविधा आहे.- डॉ. अजय भंडारवार, अधिष्ठाता, जे.जे. रुग्णालय