मुंबई :  माजी राज्यपाल आणि केरळचे माजी मंत्री के. शंकरनारायणन  (९०) यांचे दीर्घकालीन आजाराने केरळमधील पालघाट येथे रविवारी निधन झाले. शंकरनारायणन यांनी २०१० ते २०१४ या काळात राज्याचे राज्यपालपद भूषविले होते. महाराष्ट्रासह सहा राज्यांचे राज्यपालपदाची जबाबदारी त्यांनी पार पाडली होती. केरळमधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असलेल्या शंकरनारायणन यांनी वित्तसह विविध खात्यांचे मंत्रिपद भूषविले होते. केरळच्या मुख्यमंत्रीपदाची संधी त्यांना मिळू शकली नव्हती. शंकरनारायणन यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शोक व्यक्त केला आहे. शंकरनारायणन हे प्रामाणिकपणा आणि सचोटीसाठी परिचित होते, अशा शब्दांत कोश्यारी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.