मुंबई : माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्याने उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसला आहे. मला गेली तीन वर्षे घरी का बसविले, याचे कारण अजूनही समजले नाही. मला मंत्रीपद नको, काम हवे आहे, असे डॉ. सावंत यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यावर सांगितले. माजी मंत्री व ठाकरे गटातील ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचा मुलगा भूषण यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे.
‘मला शिंदे यांचा कामाचा झपाटा माहीत असून करोनाकाळात त्यांनी अनेक करोना केंद्रे उभी केली. मला त्यांच्याबरोबर आरोग्य क्षेत्रात काम करता येईल,’ यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे सावंत यांनी सांगितले. डॉ. सावंत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन दुर्गम भागात काम केले. शासकीय रुग्णालयातील त्रुटी निदर्शनास आणून त्यावर उपाय शोधले. आमची विकासाची वाटचाल सुरू असून लाखो लोक बरोबर येत आहेत. ते सगळे चुकीचे आहेत का, असा सवाल शिंदे यांनी केला.