scorecardresearch

वाझेंसह तिघांची कारागृहात चौकशी करण्यास सीबीआयला परवानगी; अनिल देशमुखांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे प्रकरण

विशेष न्यायालयाच्या परवानगीमुळे सीबीआयला १५ व १६ फेब्रुवारीला तळोजा कारागृहात जाऊन वाझे यांची चौकशी करता येणार आहे.

अनिल देशमुखांवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाचे प्रकरण

मुंबई :  माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची तळोजा कारागृहात जाऊन दोन दिवस चौकशी करण्यास विशेष न्यायालयाने सोमवारी सीबीआयला परवानगी दिली. देशमुख यांच्या माजी स्वीय साहाय्यकांचीही आर्थर रोड कारागृहात जाऊन चौकशी करण्याची सीबीआयची मागणी न्यायालयाने मान्य केली.  

विशेष न्यायालयाच्या परवानगीमुळे सीबीआयला १५ व १६ फेब्रुवारीला तळोजा कारागृहात जाऊन वाझे यांची चौकशी करता येणार आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अ‍ॅटालिया’ या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन खूनप्रकरणी वाझे सध्या अटकेत आहेत.

 मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांप्रकरणी वाझे यांचा जबाब नोंदवायचा आहे. त्यामुळे कारागृहात जाऊन त्यांचा जबाब नोंदवण्याची परवानगी द्यावी या मागणीसाठी सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. सीबीआयची ही मागणी विशेष न्यायालयाने सोमवारी मान्य केली. देशमुख यांचे माजी स्वीय सचिव संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचीही आर्थर रोड कारागृहात जाऊन चौकशी करू देण्याच्या मागणीसाठीही सीबीआयने विशेष न्यायालयात अर्ज केला होता. त्याबाबतची मागणीही न्यायालयाने मान्य केली. त्यामुळे या दोघांची १६ व १७ फेब्रुवारीला आर्थर रोड कारागृहात जाऊन सीबीआयला चौकशी करता येणार आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former home minister anil deshmukh arrows corruption special court former mumbai police commissioner parambir singh akp