मुंबई:  महाविकास आघाडी सरकारच्या काळातील मंत्री आणि नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेत बदल करण्यात आलेला नाही. राज्य गुप्तवार्ता आयुक्तांच्या शिफारशीनुसार मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षेखालील सुरक्षाविषयक उच्चाधिकार समितीच्या बैठकीत माजी मंत्र्यांच्या सुरक्षा कपातीचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयापूर्वी संबंधित व्यक्तीच्या जीवितास असलेला धोका लक्षात घेऊन त्याच्या आधारे हा निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यावर भाजप सरकारच्या काळातील माजी मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. त्याच धर्तीवर नव्या सरकारने माजी मंत्र्यांच्या सुरक्षेत कपात केली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील माजी मंत्री छगन भुजबळ, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, अशोक चव्हाण, जयंत पाटील, सुनील केदार, सतेज पाटील, विजय वडेट्टीवार, धनंजय मुंडे, भास्कर जाधव यांच्यासह वरुण सरदेसाई आदींची सुरक्षेत कपात किंवा पूर्ण काढण्यात आली आहे. तर उद्धव ठाकरे यांचे स्वीय साहाय्यक मिलिंद नार्वेकर यांच्या सुरक्षेत वाढ करून ती वाय दर्जाची करण्यात आली असून माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवताना त्यांची एस्कॉर्ट गाडी काढण्यात आली आहे.

पोलीस वाहने..

सर्व माजी मंत्र्यांना मुंबईत सशस्त्र पोलिसांबरोबरच ताफ्यात पोलीस वाहन (एस्कॉर्ट) पुरविण्यात आले होते. पोलीस सुरक्षा पूर्णपणे काढून घेण्यात आलेली नसली तरी वाहने काढून घेण्यात आली आहेत.