दोन दिवसांपूर्वी गोवंडी येथे डेंग्यूमुळे चार महिन्यांच्या मुलीचा मत्यू झाला असून, त्याचे पडसाद शुक्रवारी मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत उमटले. गोवंडी परिसरात पालिकेच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडाल्याचा पाढा नगरसेवकांनी यावेळी वाचला. मात्र प्रशासनाला त्यावर कोणतेही उत्तर देता आले नाही.
गोवंडी येथील लोटस कॉलनी येथे अलिया जहीरअली शेख या मुलीचे दोन दिवसांपूर्वी डेंग्यूमुळे निधन झाले. या घटनेमुळे गोवंडी परिसरात प्रचंड संताप व्यक्त होत आहे. नगरसेविका रेश्मा नेवरेकर यांनी आरोग्य समितीच्या बैठकीत यास वाचा फोडली. गोवंडीमध्ये पालिकेचा दवाखाना आहे, पण तेथे आरोग्य अधिकारी कधीही दिसत नाहीत, असा आरोप नेवरेकर यांनी केला. पालिका प्रशासनाकडून दर महिन्याला आरोग्य विषयक अहवाल सादर केला जातो. या महिन्याच्या अहवालात मुंबईत डेंग्यूचे केवळ ८६ रुग्ण दाखविण्यात आले आहेत. या अहवालात मोठय़ा प्रमाणावर फेरफार करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला. या संदर्भात संयुक्त समिती स्थापन करून सखोल चौकशी करण्याचे आदेश आरोग्य समिती अध्यक्ष गीता गवळी यांनी यावेळी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four month old girl dies of dengue
First published on: 21-12-2013 at 02:43 IST